जाहिरात

शाळांमध्ये मराठी भाषे बरोबरच राज्यगीत गायन अनिवार्य, शिक्षण मंत्र्यांची सूचना

प्राचार्य आणि शिक्षण विभागाचे अधिकारी यांची सहविचार बैठक मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती.

शाळांमध्ये मराठी भाषे बरोबरच राज्यगीत गायन अनिवार्य, शिक्षण मंत्र्यांची सूचना
मुंबई:

राज्य शिक्षण मंडळासह अन्य सर्व मंडळांच्या शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्ययन व अध्यापन अनिवार्य आहे. आता या पुढे राज्यगीत गायन सुद्धा ही अनिवार्य केले जावे, अशी सूचना शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केली आहे. राज्यातील सर्व शिक्षण मंडळाच्या समन्वयक, प्राचार्य आणि शिक्षण विभागाचे अधिकारी यांची सहविचार बैठक मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी शालेय शिक्षण मंत्री भुसे बोलत होते. 

या बैठकीला शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल, शिक्षण आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार, शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव तुषार महाजन, मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक राजेश कंकाळ यांच्यासह सीबीएसई, आयसीएसई, इंटरनॅशनल बोर्डाचे विविध समन्वयक व शाळांचे प्राचार्य आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

नक्की वाचा - Dombivli News: ठाकरे गटाच्या नेत्यावर हल्ला, गाडी फोडली, हल्लेखोर निघाला...

शालेय शिक्षण मंत्री भुसे म्हणाले, आयसीएसई, सीबीएसई, केंब्रिज मंडळातील शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या दहावीच्या गुणपत्रिकेवरसुद्धा मराठी हा विषय आला पाहिजे. त्यासाठी विविध मंडळांशी पत्रव्यवहार केला जाईल. राज्य मंडळाप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्यासंदर्भातील अभ्यासक्रमाचा आयसीएसई बोर्डाच्या पुस्तकामध्येही समावेश झाला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. इंटरनॅशनल बोर्डमध्ये मानव्यविद्या या विषयांमध्ये महाराष्ट्राचा इतिहास शिकवण्याबाबतही विचार केला जावा. दिव्यांग विद्यार्थी, कमी अध्ययन क्षमता असणारे विद्यार्थी यांचाही सर्वसमावेशक शिक्षणात समावेश केला जावा. असं ते म्हणाले.  

नक्की वाचा - Viral video: ही अमेरिकन महिला म्हणते भारतात अजिबात जाऊ नका, कारण ऐकून धक्का बसेल

सीसीटीव्ही सर्व शाळांमध्ये बसवले जावेत. शिक्षण हक्क अधिनियमांतर्गत अन्य बोर्डाच्या शाळांमध्ये दिल्या जाणाऱ्या प्रवेशाची तसेच शालेय शिक्षण विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची अन्य बोर्डाच्या शाळांमध्येही काटेकोर आणि प्रभावी अंमलबजावणी केली जावी. राष्ट्र प्रथम ही भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजवली जावी. ‘एक पेड माँ के नाम' या उपक्रमाची देखील प्रभावी अंमलबजावणी करावी. उत्तम सुविधा असणाऱ्या अन्य बोर्डाच्या शाळांनी मराठी माध्यमाच्या शाळांनाही मार्गदर्शन करावे, अशा सूचनाही मंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी दिल्या. विविध मंडळांच्या समन्वयक, प्राचार्य यांनी यावेळी त्यांच्या शाळांमध्ये सुरू असलेले विविध उपक्रम, अध्ययन आणि अध्यापनाचे प्रयोग, मूल्यमापन पद्धती या विषयी माहिती दिली.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com