समाधान कांबळे, प्रतिनिधी
Hingoli News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीबाबत आवाहन केल्यानंतर राज्यभरात पेट्रोल पंपावर मोठी गर्दी होण्यास सुरुवात झाली. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून अनेक जिल्ह्यांमध्ये इंधनाचा तुटवडा जाणवू लागला आहे. हिंगोली शहरातील इंदिरा चौक परिसरात असलेल्या पोलीस पेट्रोल पंपावर डिझेल खरेदीसाठी मध्यरात्री नागरिकांनी प्रचंड गर्दी केली आहे. पोलीस पेट्रोल पंपावर डिझेल टँकर उपलब्ध झाल्याची माहिती मिळताच शेतकरी आणि वाहन डिझेल खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं.
दरम्यान शेतकरी ट्रॅक्टर घेऊन तर इतर वाहन चालका आपली वाहनं घेऊन या पेट्रोल पंपावर हजर झाली. तर अनेक जण हातात कॅन घेऊन डिझेल खरेदीसाठी दाखल झाले. दरम्यान वाढत्या गर्दीमुळे वाद होऊ नये यासाठी हिंगोली शहर पोलिसांकडून पेट्रोलिंग करण्यात आलं असून शेतकऱ्यांना त्याचबरोबर वाहनचालकांना शांततेत डिझेल भरण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
डिझेल अभावी शेतीची कामं ठप्प...
सध्या शेतीच्या मशागतीची कामं सुरू आहेत. काही दिवसांवर खरीप हंगामाची पेरणी येऊन ठेपली आहे. मात्र शेतकऱ्यांची शेती मशागतीची कामं पूर्ण झालेली नाही. शेतीच्या कामासाठी डिझेलची गरज असते. डिझेलअभावी नांगरणी असेल वखरणी, रोटर, अशी पेरणीपूर्वीची कामे ठप्प झाली आहेत. शेतकरी पेट्रोल पंपांवर डिझेल खरेदीसाठी गर्दी करत असल्याने हिंगोलीत काही पेट्रोल पंप चालकाकडून शेतकऱ्यांना केवळ दीड हजार रुपयांचं किंवा दोन हजार रुपयाचं डिझेल दिलं जात आहे.. हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी पेट्रोल पंप चालकांना डिझेल देऊ शकत नसाल तर एनओसी रद्द करतो अशा सक्त सूचना देखील केली आहे. तरीसुद्धा पेट्रोल पंप चालकांकडून जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनांचे पालन केले जात नसल्याचे दिसून येत आहे.. दरम्यान हिंगोलीतील शेतकऱ्यांवर कधी हळदीच्या रांगेत उभे राहण्याची वेळ येते तर कधी पेट्रोल पंपावर डिझेलसाठी रांगेत उभं राहावं लागत आहे.
वाशिममध्ये शेतकऱ्यांचे हाल
मागील चार दिवसांपासून वाशिम जिल्ह्यातील शेतकरी डिझेल टंचाईमुळं त्रस्त असून पंपावर रात्री उशिरापर्यंत डिझेलसाठी शेतकऱ्यांच्या लांबच लांब रागा लागल्याचं बघायला मिळतंय. शेतकऱ्यांचा दिवसातील बहुतेक वेळ डिझेलची जुळवाजुळव करण्यातच जातोय. त्यामुळे शेती मशागतीची कामं खोळंबली आहेत. आज सायंकाळच्या सुमारास वाशिम शहरातील काही पंपावर डिझेल उपलब्ध झालं होतं, तिथं वाहन धारक आणि शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली. परिणामी चार ते पाच तास रांगेत राहूनही डिझेल मिळेल की नाही याची शाश्वती शेतकऱ्यांना नाही.