नवी मुंबई विमानतळ कसे गाठाल? जवळचे रेल्वे स्टेशन कोणते? एका क्लिकवर मिळेल सगळी माहिती

How To Reach Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळ गाठण्यासाठी आम्ही तुम्हाला 7 मार्ग सांगणार आहोत, ज्यांचा वापर करून तुम्ही विनासायास विमानतळ गाठू शकाल.

जाहिरात
Read Time: 3 mins
मुंबई:

Fastest Route to Reach Navi Mumbai Airport: नवी मुंबई येथे उभे राहिलेले विमानतळ हे देशातील बहुप्रतीक्षित पायाभूत सुविधा प्रकल्पांपैकी एक आहे. हे विमानतळ बांधून पूर्ण झाले असून लवकरच त्याचे उद्घाटन केले जाणार आहे. नोव्हेंबर महिन्यापासून या विमानतळावरून विमाने अवकाशात झेपावण्यास सुरूवात होईल. या विमानतळामुळे मुंबईतील विमानतळावरील भार कमी होईल अशी अपेक्षा आहे. मुंबईतून होणारी काही उड्डाणे या विमानतळावरून होतील त्यामुळे इथपर्यंत पोहचायचे कसे हा अनेकांपुढील प्रश्न आहे. नवी मुंबई विमानतळ गाठण्यासाठी आम्ही तुम्हाला 7 मार्ग सांगणार आहोत, ज्यांचा वापर करून तुम्ही विनासायास विमानतळ गाठू शकाल. पुढील काही वर्षांत मुंबईचे विमानतळ आणि नवी मुंबई विमानतळ जोडण्यासाठी मेट्रो मार्ग सुरू होईल. तोपर्यंत कोणत्या मार्गांचा वापर करून तुम्ही हे विमानतळ गाठू शकाल ते पाहूया. 

नक्की वाचा: दिवाळीपूर्वीच मुंबईला 'डबल गिफ्ट'! नवी मुंबई विमानतळ, मेट्रो 3 चा मुहूर्त ठरला

दक्षिण मुंबईतून नवी मुंबई विमानतळ कसे गाठाल?

वरळीपासून जर तुम्ही प्रवास सुरू केलात तर तुम्हाला कोस्टल रोडवरून ईस्टर्न फ्रीवे गाठावा लागेल. तिथून अटल सेतू मार्गावरून उलवे-बेलापूर मार्गावर यावे लागेल. हा मार्ग विमानतळाला जोडणारा आहे. 35 किलोमीटरच्या या प्रवासासाठी 70 मिनिटे लागतील. 

पूर्व उपनगरातून नवी मुंबई विमानतळ कसे गाठाल?

पवईतून तुम्ही प्रवास सुरू करणार असाल तर तुम्हाला विक्रोळी किंवा मुलुंडपर्यंत येऊन ईस्टर्न फ्रीवे गाठावा लागेल तिथून ऐरोलीमार्गे ठाणे-बेलापूर मार्गावर येता येईल. इथून पाम बीच मार्गावरून विमानतळापर्यंत पोहोचता येईल. घाटकोपर किंवा चेंबूरवरून यायचे असल्यास तुम्हाला छेडानगरमार्गे मानखुर्दवरून वाशी मार्गावर येता येईल, तिथून तुम्हाला पाम बीच मार्गावरून नवी मुंबई विमानतळ गाठता येईल. हा मार्ग अंदाजे 34 किलोमीटरचा असून यासाठी अंदाजे 70 मिनिटे लागतील. 

ठाण्यावरून नवी मुंबई विमानतळ कसे गाठाल ?

ठाण्यातील विविआना मॉलपासून तुम्ही प्रवासाला सुरूवात करणार आहात असे धरले तर तुम्हाला ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरून मुलुंडमार्गे ऐरोली गाठावे लागेल. तिथून ठाणे-बेलापूर मार्गाने, बेलापूर-उलवे मार्गाने नवी मुंबई विमानतळ गाठता येईल. हा मार्ग देखील अंदाजे 34 किलोमीटरचा असून यासाठी एक तास लागण्याची शक्यता आहे. ठाण्याहून नवी मुंबई विमानतळ गाठण्यासाठी दुसरा मार्ग म्हणजे सेंट्रल जेलवरून कळव्याच्या दिशेने जात ठाणे-बेलापूर मार्गाला लागता येईल. 

Advertisement

नक्की वाचा: 30 मिनिटात सांताक्रूझ ते नवी मुंबई; विमानतळांना जोडणारा भव्य प्रकल्प

पश्चिम उपनगरातून नवी मुंबई विमानतळावर कसे पोहोचता येईल?

गोरेगावातील ओबेरॉय मॉलपासून तुम्ही प्रवासाला सुरूवात केली तर तुम्ही वांद्रे सी-लिंक, ईस्टर्न फ्रीवेवरून अटल सेतू गाठत नवी मुंबई विमातळावर पोहोचू शकता. अन्यथा जेव्हीएलआर मार्गे ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर येऊन ऐरोली किंवा वाशीमार्गे नवी मुंबई विमानतळापर्यंत पोहोचू शकता. हा दुसरा मार्ग अंदाजे 45 किलोमीटरचा असून यासाठी अंदाजे 95 मिनिटे लागू शकतात. 

मीरा रोडवरून नवी मुंबई विमानतळावर कसे पोहोचता येईल?

मीरा रोडवासीयांना नवी मुंबई विमानतळ गाठणे थोडे कठीण आहे, कारण त्यांना घोडबंदर हा सर्वात सोयीचा रस्ता आहे मात्र त्याची अवस्था सध्या प्रचंड वाईट आहे. घोडबंदर मार्गे ठाण्यात येऊन ठाणे-बेलापूर रस्त्याने बेलापूर-उलवे रोडवर येऊन नवी मुंबई विमानतळ गाठता येईल. 

Advertisement

कल्याण, डोंबिवली, बदलापूर, अंबरनाथवरून नवी मुंबई विमानतळावर कसे पोहोचता येईल?

कल्याण, डोंबिवली, बदलापूर, अंबरनाथवरून नव्या विमानतळावर पोहोचायचे असेल तर काटई नाकामार्गे शिळफाट्याहून कळंबोली सर्कल गाठावे लागेल तिथून पनवेल उरण रस्त्याने नवी मुंबई एअरपोर्ट गाठता येईल. हा मार्ग 37 किलोमीटरचा असून त्यासाठी 1 तास 20 मिनिटे लागण्याची शक्यता आहे. दुसरा पर्याय म्हणजे महापेमार्गाने ठाणे-बेलापूर रोडवर येऊन नवी मुंबई विमानतळाच्या दिशेने जाता येईल. 

नवी मुंबई विमानतळावर पोहोचण्यासाठी मेट्रो कधी सुरू होणार ?

मुंबई ते नवी मुंबई विमानतळ जोडणाऱ्या मेट्रो मार्गाची घोषणा करण्यात आली असून हा मार्ग पूर्ण होण्यासाठी आणखी 4 वर्षे वाट पाहावी लागेल. 2029 पर्यंत हा मार्ग पूर्ण होण्याची शक्यता आहे. 

Advertisement

नक्की वाचा: नवी मुंबई एअर पोर्टवरून कुठे कुठे विमानं जाणार? एअर इंडियाने जारी केली पहिली लिस्ट

नवी मुंबई विमानतळावर पोहोचण्यासाठी सगळ्यात जवळचे रेल्वे स्टेशन कोणते ?

नवी मुंबई विमानतळावर पोहोचण्यासाठी सगळ्यात जवळचे रेल्वे स्टेशन हे तरघर आहे. हे रेल्वे स्टेशून बांधून पूर्ण झाले असून त्याचे लवकरच उद्घाटन केले जाणार आहे. सीवूडस किंवा बेलापूरवरून उरणला येऊन तिथून दुसरी लोकल पकडून तरघर रेल्वे स्टेशनपर्यंत पोहोचता येईल. 
 

Topics mentioned in this article