अविनाश पवार, आंबेगाव: 'मला ईडी, सीबीआय अथवा अन्य कोणत्या एजन्सीची नोटीस आलेली नाही. कोणीही त्या संदर्भातील पुरावा आज रात्री नऊ वाजेपर्यंत आणून द्यावा, मी उद्या सकाळी माझी उमेदवारी मागे घेतो,' असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते, आंबेगाव विधानसभेचे उमेदवार दिलीप वळसे पाटील यांनी केले आहे. आंबेगाव येथे झालेल्या विधानसभा निवडणूक प्रचाराच्या सांगता सभेत ते बोलत होते.
काय म्हणाले दिलीप वळसे पाटील?
'काही म्हणतात अटक होणार होती, काही म्हणतात ईडी आणि सीबीआयची नोटीस आली होती. म्हणून त्यांनी शरद पवारांना सोडून ते दुसऱ्या पक्षात गेले. मात्र मी यापूर्वी अनेकदा सांगितलेलं आहे. मला ईडी, सीबीआय अथवा अन्य कोणत्या एजन्सीची नोटीस आलेली नाही. जर कोणी त्या संदर्भातील पुरावा आज रात्री नऊ वाजेपर्यंत आणून द्यावा, मी उद्या सकाळी माझी उमेदवारी मागे घेतो,' असे सर्वात महत्वाचे विधान दिलीप वळसे पाटील यांनी केले.
नक्की वाचा: 'सगळ्यात मोठा जोकर, सोंग्या, भोंग्या...', CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
विरोधक म्हणतात माझी नार्को टेस्ट करा, बिंधास्त करा. पण माझी ही करा अन देवदत्त निकमांची ही नार्को टेस्ट करा. माझ्या नार्को टेस्टमध्ये काय बाहेर पडेल याची मला कल्पना आहे, पण तुम्हाला तर तोंड दाखवायला जागा राहणार नाही. आता विरोधक म्हणाले महिला असुरक्षित आहेत, मग करू न आपण सगळी चौकशी. बदलापूर पासून ते नागापूरपर्यंत सगळी चौकशी करूयात. अहो यांना गावातील एक पतसंस्था चालवता आली नाही अन हे विधानसभा अन राज्य चालवायची भाषा करतायेत,असा टोलाही त्यांनी शरद पवार गटाचे उमेदवार देवदत्त निकम यांना लगावला.
दरम्यान, विधानसभा अध्यक्ष असताना मी आमदारांना थांबवायचो पण आज मला लोक थांबवत आहेत. पण काही हरकत नाही, शेवटचा श्वास असेपर्यंत तुमच्या पाण्यासाठी लढा देत राहीन. मी रडायचं कारण तरी काय? मी काय चोऱ्या-माऱ्या केल्यात का? मी जनतेच्या पाण्यासाठी भाजप सोबत सत्तेत गेलेलो आहे. मी हा निर्णय का घेतला तर मग बघा हा व्हिडीओ, असे म्हणत देवदत्त निकम यांच्याप्रमाणे दिलीप वळसे पाटील यांनीही जाहीर सभेमध्ये व्हिडिओ दाखवला.
महत्वाची बातमी: 'खरा गद्दार घरात बसलाय', उद्धव ठाकरेंचं नाव घेऊन राज ठाकरेंचा थेट हल्ला