जाहिरात

कोविडमध्ये क्वारंटाईन केंद्र झाडलं, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला आधार; IAS अधिकाऱ्याची दुसरी बाजू

पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी बोलावलेल्या बैठकीला पर्यावरण महामंडळाचे सचिव आणि सनदी अधिकारी एम. देवेंद्र सिंग गैरहजर होते. यानंतर त्यांच्याविरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश दिले.

कोविडमध्ये क्वारंटाईन केंद्र झाडलं, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला आधार; IAS अधिकाऱ्याची दुसरी बाजू

Suspension of IAS officer M Devendra Singh : विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात IAS अधिकारी एम देवेंद्र सिंह यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. अधिवेशन काळात पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांना ब्रिफिंग न दिल्यामुळे ही कारवाई केल्याचं समोर आलं आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी बोलावलेल्या बैठकीला पर्यावरण महामंडळाचे सचिव आणि सनदी अधिकारी एम. देवेंद्र सिंग गैरहजर होते. भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्यासह अनेकांनी सभागृहात आक्रमक भूमिका घेतली होती. या अधिकाराच्या विरुद्ध हक्कभंग आणण्याची तयारी सुधीर मुनगंटीवार यांनी केली होती. विधानसभेत याचे तीव्र पडसाद उमटल्यानंतर तालिका अध्यक्ष दिलीप लांडे यांनी देवेंद्र सिंग यांच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर सामान्य प्रशासन विभागाने तातडीने देवेंद्र सिंग यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला. 


सामान्य प्रशासन विभागाने देवेंद्र सिंग यांना निलंबित करण्यात येत असल्याचे आदेश शुक्रवारी काढले. निलंबन काळात देवेंद्र सिंग यांचे मुख्यालय मुंबई येथे असेल. त्यांनी कोकण विभागीय आयुक्तांची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय मुख्यालय सोडू नये, असे आदेश देण्यात आले आहेत. निलंबन कालावधीत सिंग यांना महागाई भत्ता, निर्वाह भत्ता आणि इतर भत्ते देण्यात येतील. यासाठी त्यांनी इतर कोणत्याही नोकरी, व्यवसाय, पेशा किंवा उपजीविकेत गुंतलेले नसल्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. मात्र वरील अटींचे कोणतेही उल्लंघन केल्यास ते गैरवर्तन समजले जाईल, असंही म्हटलं आहे. 

नक्की वाचा - Amravati News: अमरावती महापालिकेत स्वच्छतेवर चर्चा, अन् विरोधी पक्षनेत्यांनी सभागृहातच मळली तंबाखू, पाहा VIDEO

यवतमाळमध्ये मिशन उभारी ही महत्त्वाकांक्षी योजना राबवली...

आयएएस अधिकारी एम देवेंद्र सिंह यांच्यावर निलंबनाची कारवाई केली जाणार आहे. सत्ताधारी नेते त्यांच्यावर आरोपांचा भडीमार करत आहेत. काही जण त्यांच्या अरेरावी आणि उद्धटपणाचे किस्सेही सांगत आहेत. पण याच अधिकाऱ्याची एक दुसरी ओळख आहे आणि ही ओळख सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीने फारच वेगळी आहे. यवतमाळसारख्या शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात त्यांनी लक्षणीय कामगिरी केली होती. यवतमाळमधील कार्यकाळात त्यांनी मिशन उभारी ही महत्त्वाकांक्षी योजना राबवली. या उपक्रमातून पात्र आणि अपात्र अशा दोन्ही प्रकारच्या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना आधार दिला. त्यांना आर्थिक आणि मानसिक बळ दिलं. केवळ मदत वाटप न करता त्यांनी या कुटुंबांना स्वावलंबनाकडे नेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अनेक कुटुंबे पुन्हा उभी राहिली आणि आत्मविश्वासाने जगू लागली.


संकटाच्या काळात धैर्य आणि तत्परता यांचं दर्शन घडवणारा अधिकारी



कोरोना महामारीच्या भीषण काळात एम देवेंद्र सिंह यांनी केलेलं काम आजही प्रेरणादायी मानलं जातं. यवतमाळ शहरातील क्वारंटाईन केंद्रात हजारो कोरोना रुग्ण उपचार घेत होते. तेव्हा या केंद्रावरील ऑक्सिजन संपला होता. आणि कुणीच तिथे जाण्याचं धाडस दाखवत नव्हतं. अशावेळी एम देवेंद्र सिंह यांनी स्वत: ऑक्सिजनची गाडी केंद्रावर पोहोचवली. एवढच नाही तर स्वत: हातात झाडू घेऊन क्वारंटाईन केंद्राची साफसफाई केली. सर्व प्रोटोकॉल बाजूला ठेवून रस्त्यावर उतरून काम करणारा अशी त्यांची ख्याती होती. संकटाच्या काळात धैर्य आणि तत्परता यांचं दर्शन घडवणारा अधिकारी म्हणून आजही यवतमाळचे नागरिक त्यांचं नाव काढतात. यवतमाळ जिल्ह्यात त्यांना केवळ 1 वर्ष आणि महिना काम करता आलं आहे. मात्र त्यांच्या बदलीची ऑर्डर आल्यानंतर यवतमाळकरांनी हळहळ व्यक्त केली होती. असा हा अधिकारी आता मंत्र्यांकडून होणाऱ्या आरोपांच्या चक्रव्यूहात अडकलाय. मंत्र्यांना ब्रिफिंग न देणं हे त्यांच्यावरील कारवाईचं प्रमुख कारण आहे. पण त्या मागची नेमकी कारण काय आहेत. हेदेखील जाणून घेणं तितकंच गरजेचं आहे.

 
 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com