
सुनील दवंगे, प्रतिनिधी
अपंगत्व आलं म्हणजे आयुष्य संपलं, अशी समजूत अनेकांच्या मनात असते. मात्र, या विचारांना छेद देणारी आणि खऱ्या अर्थाने प्रेरणा देणारी कहाणी आहे पवन रावत या दिव्यांग तरुणाची. मध्यप्रदेशातील सतना जिल्ह्यातील पवन रावत साई बाबांच्या शिर्डीत साईचे लॉकेट, हँगर विकून आपला उदरनिर्वाह करतोय. जिद्द, संघर्ष आणि आत्मभानाचं जिवंत उदाहरण देणारा हा स्पेशल रिपोर्ट.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
साई बाबांच्या शिर्डीच्या गर्दीत एका पायावर उड्या मारत चालणारा हा पंचवीस वर्षीय पवन रावत. हातात साईबाबांचे लॉकेट आणि वाहनात अडकणारे साई हँगर विकून तो आपलं आणि आपल्या परिवाराचं पोट भरतो. गेल्या दहा - बारा वर्षांपासून पवन शिर्डीत वास्तव्याला आहे. तसा पवन हा मध्यप्रदेश जिल्ह्यातील सतना जिल्ह्यातील राहणारा. केवळ सात-आठ वर्षांचा असताना एक मोठं संकट त्याच्या आयुष्यात आलं. बाल्यावस्थेतच विजेची तार त्याच्या अंगावर पडली आणि करंट लागून त्याचा डावा हात-पाय पूर्णतः जळून गेला. यानंतर त्याची शस्त्रक्रिया केली तेव्हा त्याचा एक हात आणि पाय शरीरापासून वेगळा झालेला होता. सुरुवातीला एक हात आणि एका पायाच्या जोरावर त्याला उभं राहणं कठीण होतं.
शाळा सुटली, चालता येईना अशातच त्यानं लहानपणीच साईबाबांची शिर्डी गाठली. येथे आल्यावर अनेकांनी त्याला भीक मागून पोटभरण्याचा सल्ला दिला मात्र त्याला तो रुचेना.. लहान असताना त्यांने खरकत -खरकत साई बाबांचे फोटो विकले.. जस जसा मोठा झाला तसा त्यानं स्वतःला सिद्ध करत एका पायावर उभा राहीला आणि शिर्डीच्या साईदरबारी लॉकेट, हॅगर अशा वस्तू विकू लागला. पवन सध्या वैवाहिक असून त्याला दोन मुली आहेत. घरचा सर्व प्रपंच तोच सांभाळतो. तो आज एका हाताने आणि एका पायाने सायकल चालवतो. या सायकलमधून तो साई बाबांच्या द्वारकामाई परिसरात येतो. छोटं-मोठं काम करतो आणि आपली उपजीविका स्वतःच्या मेहनतीने चालवतो.
नक्की वाचा - Mumbai-Pune Highway : पुणे-नाशिक अंतर 2 तासांनी कमी होणार? सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प लवकरच सुरू होणार
आज पवन एकाच हाताने आणि एका पायाने स्वतःचं आयुष्य जगत आपल्या परिवाराचा सांभाळ करतोय. तेही आत्मसन्मानाने. त्याने कधीच कोणाकडे हात पसरवला नाही, भीक मागितली नाही. कोणी दया दाखवत भीक दिली तर तो ते पैसे घेत नाही. त्या बदल्यात वस्तू देतो.
आज पवन केवळ स्वतःचं आयुष्य सावरत नाही. तर समाजासाठीही एक प्रेरणास्रोत बनलाय. आज समाजात अनेक धडधाकट व्यक्ती भीक मागताना दिसून येतात. अशा व्यक्तींवर कारवाई होणं अपेक्षितच आहे. मात्र त्याच बरोबर पवनसारख्या जिद्दी आणि स्वाभिमानी दिव्यांगाच मनोबल वाढत त्याला सरकारी योजनेतून लाभ मिळवून देणं देखील महत्त्वाचं आहे.
पवन रावतसारख्या व्यक्ती समाजात फार कमी वेळा भेटतात. त्यांचं आयुष्य संघर्षमय असलं, तरी त्यांची वृत्ती प्रेरणादायी आहे. भीक न मागता, कोणावर अवलंबून न राहता, एका हाताने आणि एका पायावर तो जगण्याचा संघर्ष करतोय. आज पवन आपल्या मेहनतीने जीवन जगतो आहे. आज पवनसारखे लोक आपल्याला शिकवतात की, आत्मसन्मान, मेहनत आणि जिद्द यांच्या जोरावर कोणतीही परिस्थिती बदलता येते. पवनच्या या प्रेरणादायी वाटचालीला मनापासून सलाम.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world