
Tomato Prices : लातूर जिल्ह्यातलं वडवळ नागनाथ हे गाव टोमॅटोचं गाव म्हणून अशी ओळख आहे. या गावातील शेतकरी मोठ्या प्रमाणात टोमॅटोचं उत्पादन घेतात. वडवळ नागनाथ येथील टोमॅटो देशभरात आणि राज्यातील अनेक बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी जातो. वडवळ नागनाथ येथील टोमॅटोतून एका वर्षात 18 ते 20 कोटींची उलाढाल होते. मात्र आंतरराष्ट्रीय धोरण आणि बाजारपेठांमध्ये टोमॅटोची वाढलेली झालेली आवक यामुळे शेतकऱ्यांच्या टोमॅटोला कवडीमोल भाव मिळत आहे. टोमॅटो उत्पादन करण्यासाठी लागणारा खर्च सुद्धा निघत नसल्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
लातूर जिल्ह्यातील वडवळ नागनाथ येथे 500 हेक्टर वरती टोमॅटोचे उत्पादन घेतले जाते. गेल्या अनेक वर्षापासून टोमॅटोपासून चांगले उत्पादन मिळत असल्याने वडवळ नागनाथ येथील शेतकऱ्यांचा कल टोमॅटो उत्पादनाकडे वाढला आहे. मात्र यावर्षी टोमॅटोचा बाजार भाव पडल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. उत्पादन करण्यासाठी एकरी एक लाख 80 हजार रुपये इतका खर्च लागतो. मात्र बाजार भाव नसल्याने शेतकऱ्यांचे एकरी दोन हजार कॅरेट टोमॅटो शेतावरच सडत आहेत. टोमॅटो लागवडीसाठी केलेला खर्च ही पदरी पडत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. सरकारने टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी टोमॅटोला हमीभाव द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
वडवळ येथील टोमॅटो देशातल्या अनेक राज्यासह परदेशातही विक्री केली जात होती. मात्र गेल्या सहा वर्षापासून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील बदलामुळे पाकिस्तानमध्ये निर्यात होणाऱ्या टोमॅटोवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसत आहे. परिणामी शेतकऱ्यांना कवडीमोल भावाने टोमॅटोची विक्री करावी लागत आहे. यावर्षी मोठ्या प्रमाणात बाजार टोमॅटोची आवक वाढल्याने दर घसरल्याचे सांगितले जातेय. सरकारने टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांकडे लक्ष देऊन योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली जात आहे.
नक्की वाचा - Onion Export Duty: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! कांद्यावरील 20 टक्के निर्यात शुल्क हटवले, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
टोमॅटोच्या दरात घसरण झाल्याने गेल्या दीड महिन्यांपासून सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. वडवळ येथून दिवसाला 20 गाड्यांची वाहतूक केली जाते. इथला टोमॅटो काश्मीर, गुजरात, कर्नाटक, बिहार, पंजाब, मुंबई या ठिकाणी विक्रीला पाठवला जातो. मात्र बाजारात टोमॅटोच्या पडलेल्या भावामुळे व्यापारी हवालदील झाले आहेत. गेल्या एक ते दोन महिन्यापासून टोमॅटोची होणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. भाव पडल्याने वाहतुकीचाही खर्च निघत नसल्याने टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांसह व्यापारी वर्गावरही संक्रात आली आहे. त्यामुळे सरकारने प्रदेशातील निर्यात बंदी उठवावी अशी मागणी व्यापारी वर्गातून केली जात आहे....
कधी आसमान तर कधी सुलतानी संकटाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो. सतत शेतीमालाच्या पडलेल्या भावाने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. शेतीला जोड व्यवसाय म्हणून टोमॅटो उत्पादनातही शेतकऱ्यांच्या हाती निराशाच आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सरकार दरबारी शेतकऱ्यांची दखल घेतली जाईल का? शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळेल का? असा केविलवाणा सवाल शेतकरी वर्गातून उपस्थित केला जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world