बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख (Actor Ritesh Deshmukh) निवडणुकीच्या मैदानात उतरला आहे आणि आपल्या दोन्ही भावांसाठी प्रचार करीत आहेत. लातूर जिल्ह्याच्या दोन्ही विधानसभा मतदारसंघावरुन माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची मुलं अमित देशमुख आणि धीरज देशमुख काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहेत. अमित देशमुख लातूर शहरातून तर लहान बंधू धीरज देशमुख लातूर ग्रामीणमधून दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
नक्की वाचा - 'अमित शाह म्हणजे मुन्ना भाई MBBS मधले...' ठाकरेंनी खडे-खडे सुनावले
त्यामुळे रितेश देशमुख (Ritesh Deshmukh Speech) आणि त्याची आईदेखील दोघांचाही प्रचार करीत आहेत. रितेश देशमुख धडाकेबाज भाषण करीत मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत आहे. रविवारी रितेश देशमुख याने लातूरमध्ये सभा घेतली होती. या सभेला मोठी गर्दी झाली होती.
यावेळी तो म्हणाला, "जो पक्ष तुम्हाला धर्म बचाव म्हणतो. धर्म धोक्यात आहे म्हणतो. खरं म्हणजे ते धर्माला प्रार्थना करत आहेत, आमचा पक्ष धोक्यात आहे. तुम्ही आम्हाला वाचवा. यांच्या भूल थापांना बळी पडण्याची गरज नाही. त्यांना म्हणा, धर्माचं आम्ही बघून घेतो. आमच्या कामाचं सांगा. धर्माचं आम्ही बघून घेतो, तुम्ही पिकाचा भाव सांगा. धर्माचा आम्ही बघून घेतो, तुम्ही आमच्या आया-बहिणी सुरक्षित आहेत का? ते सांगा" असं अभिनेता रितेश देशमुख म्हणाला.
रितेश देशमुख याने सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधत एक लाखांपेक्षा जास्त लीडने धीरज देशमुख यांना निवडून द्या, असं आवाहन केलं आहे. यावेळी त्यांनी लय भारी चित्रपटातील काही डायलॉग आणि बिग बॉसचा विजेता सुरज चव्हाण याचेही डायलॉग उपस्थितांना ऐकवले.
“तुमचा पंजा भारी, माझा पंजा भारी, सगळ्यांचाच पंजा लय भारी”, लोकसभेला जे वारं होतं, आता विधानसभेला झापूक झुपूक वारं झालेलं आहे. त्यामळे काहीही काळजी करू नका. आता समोर गुलिगत धोका आहे. सावधान राहा. त्या धोक्याला बळी पडू नका. आपला उमेदवार चांगला आहे. आता बुक्कीत नाही, बटणावर टेंगूळ द्यायची वेळ आलीय”, असं रितेश देशमुख म्हणाले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world