जाहिरात

Jalgaon News :: माणुसकी शून्य! जवानाच्या मुलीच्या मृतदेहासाठी हॉस्पिटलमध्ये जागा नाही; सुन्न करणारी घटना

Jalgaon News: अवघ्या अडीच महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू आणि त्यानंतर तिच्या मृतदेहाची झालेली विटंबना संपूर्ण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी आहे.

Jalgaon News :: माणुसकी शून्य! जवानाच्या मुलीच्या मृतदेहासाठी हॉस्पिटलमध्ये जागा नाही; सुन्न करणारी घटना
Jalgaon News: चाळीसगावमध्ये घडलेली ही घटना वाचल्यावर तुमच्या अंगावर काटा येईल.
जळगाव:

मंगेश जोशी आणि योगेश पाटील, प्रतिनिधी

Jalgaon News: एका बाजूला देशाच्या सीमेवर डोळ्यात तेल घालून पहारा देणारा जवान आणि दुसऱ्या बाजूला त्याच जवानाच्या कुटुंबाच्या नशिबी आलेली ही भयंकर अवहेलना. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावमध्ये घडलेली ही घटना वाचल्यावर तुमच्या अंगावर काटा येईल. अवघ्या अडीच महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू आणि त्यानंतर तिच्या मृतदेहाची झालेली विटंबना संपूर्ण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी आहे.

एका लसीने होत्याचं नव्हतं केलं

चाळीसगाव तालुक्यातील टाकळी येथील बोरसे कुटुंबात अडीच महिन्यांची चिमुकली सचिता हिच्या येण्याने आनंदाचे वातावरण होते. मात्र, लसीकरण झाले आणि अवघ्या 10 मिनिटांत या चिमुकलीची प्रकृती खालावली. आई-वडिलांनी तिला तातडीने रुग्णालयात नेले, पण नियतीला काही वेगळेच मान्य होते. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले आणि एका क्षणात हसत्या-खेळत्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.

हृदय पिळवटून टाकणारी ती रात्र

बाळाचा मृत्यू झाला, पण त्यानंतर जे घडलं ते माणुसकीला काळिमा फासणारं होतं. मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यासाठी रात्रीची वेळ असल्याने डॉक्टरांनी ते सकाळी करण्याचे सांगितले. मात्र, तोपर्यंत मृतदेह ठेवण्यासाठी रुग्णालयात साधी जागाही उपलब्ध करून देण्यात आली नाही. त्यामुळे त्या चिमुकलीचे आजोबा आपल्या लाडक्या नातीचा निष्प्राण देह मांडीवर घेऊन रात्रभर शवविच्छेदन कक्षाबाहेर बसून राहिले. रात्रीच्या अंधारात, थंडीत आणि प्रचंड मानसिक वेदनेत या आजोबांनी संपूर्ण रात्र त्यांच्या नातीला मांडीवर घेऊन काढली.

( नक्की वाचा : Family Man अभिनेत्याच्या पत्नीला सहाव्यांदा Oral Cancer ची लागण, एकमेकांवरील प्रेम वाचून कराल सलाम! )
 

व्यवस्थेचे क्रूर दर्शन

ज्या देशासाठी जवान सीमेवर लढतो, त्याच जवानाच्या कुटुंबाला आपल्या हक्काच्या माणसाचा मृतदेह ठेवण्यासाठी सन्मानाची जागा मिळू नये, ही शोकांतिका आहे. "शवविच्छेदन सकाळी करा, पण किमान मृतदेह नीट ठेवायला तरी जागा द्यायला हवी होती," असा आर्त टाहो फोडणाऱ्या आजोबांच्या डोळ्यातील पाणी व्यवस्थेला अनेक बोचरे प्रश्न विचारत आहे. त्या रात्री रुग्णालयातील माणुसकी नेमकी कुठे हरवली होती, असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत.

अनुत्तरित प्रश्न आणि संताप

या घटनेनंतर वैद्यकीय प्रशासनावर टीकेची झोड उठत आहे. लसीकरणानंतर अवघ्या काही मिनिटांत झालेला हा मृत्यू नेमका कशामुळे झाला? हा वैद्यकीय हलगर्जीपणा आहे की लसीचा दुष्परिणाम? तसेच, मृतदेहासाठी किमान सुविधा का उपलब्ध नव्हत्या? ड्युटीवर असलेले कर्मचारी आणि डॉक्टर त्यावेळी नेमकी काय भूमिका बजावत होते? असे अनेक प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत.

( नक्की वाचा : NEET paper leak : नाव मेडिकलला, पण कनेक्शन पेपर लीकच्या टोळीशी! नाशिकच्या शुभम खैरनारची 'कुंडली' आली समोर )
 

आता प्रतीक्षा न्यायाची

या प्रकरणी अतिरिक्त जिल्हा चिकित्सक आकाश चौधरी आणि वैद्यकीय अधीक्षक योगिता बावसकर यांनी आपली बाजू मांडली असली, तरी कुटुंबाचे झालेले नुकसान भरून येणारे नाही. चौकशीच्या नावाखाली केवळ कागदपत्रे रंगवली जाणार की खरोखर दोषींवर कारवाई होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एका जवानाच्या कुटुंबाला मिळालेली ही वागणूक सामान्य माणसाच्या मनात भीती आणि संताप निर्माण करणारी आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com