मंगेश जोशी, जळगाव:
Jalgaon Municiple Corporation Election 2026: जळगाव महापालिका निवडणुकीने यंदा अनेक अर्थांनी राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले. निकालात केवळ सत्तासमीकरणेच बदलली नाहीत, तर अनेक धक्कादायक, अनपेक्षित आणि चर्चेचे मुद्देही समोर आले. पक्षप्रवेश घराणेशाही यासह आरोप प्रत्यारोपावरून जळगाव मधील संपूर्ण राजकीय वातावरणच ढवळून निघाले.
जळगावच्या निवडणुकीतील 10 ठळक वैशिष्ट्ये
- कारागृहातून थेट विजयाची मुसंडी: शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आणि माजी महापौर ललित कोल्हे यांनी कारागृहात असतानाही विजय मिळवत राजकीय इतिहासात नोंद केली. अडचणी, आरोप आणि कारावास असूनही मतदारांनी दिलेला कौल चर्चेचा विषय ठरला.
- कोल्हे कुटुंबाची ‘हॅट्रिक': ललित कोल्हे यांच्यासह त्यांचा मुलगा पियुष कोल्हे आणि आई सिंधू कोल्हे हे तिघेही विजयी झाले. एका कुटुंबातील तीन सदस्यांचा विजय ही निवडणुकीतील मोठी बाब ठरली.
- नव्या चेहऱ्यांचा पूर – 57 टक्के बदल: महापालिकेच्या 75 पैकी 43 जागांवर नवे नगरसेवक निवडून आले. तब्बल 57 टक्के सभागृह नवे असल्याने ‘बदलाचा कौल' मतदारांनी दिल्याचे स्पष्ट झाले.
- अजित पवार गटाचे खाते उघडले: राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांना प्रफुल्ल देवकर यांच्या माध्यमातून महापालिकेत खाते उघडता आले. विशेष म्हणजे तेच अजित पवार गटाचे एकमेव विजयी उमेदवार ठरले.
- सोनवणे कुटुंबाची दुहेरी एंट्री: शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत सोनवणे यांचा मुलगा गौरव सोनवणे आणि मुलगी अमृता सोनवणे हे दोघेही विजयी झाले. त्यामुळे घरातून थेट दोन नगरसेवक सभागृहात दाखल होणार आहेत.
- बिनविरोध जागा, पण दिग्गजांचा पराभव: शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार व उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या आईने उमेदवारी माघार घेतल्याने भाजपचा उमेदवार बिनविरोध निवडून आला. मात्र त्याच वेळी कुलभूषण पाटील यांना निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला, हा निकाल आश्चर्यकारक ठरला.
- 158 अपक्षांपैकी एकमेव यश: या निवडणुकीत तब्बल 158 अपक्ष उमेदवार रिंगणात होते. मात्र प्रभाग क्रमांक 1 मधून भारती सोनवणे या एकमेव अपक्ष उमेदवार विजयी ठरल्या.
- पक्ष बदलाचा फटका: ठाकरे गटातून भाजपमध्ये प्रवेश करून, नंतर भाजपच्या कोट्यातून राष्ट्रवादी अजित पवार गटाला गेलेल्या जागेतून घड्याळ चिन्हावर लढणारे माजी नगरसेवक प्रशांत नाईक यांना पराभव पत्करावा लागला. पक्षबदलाचा परिणाम मतदारांनी दाखवून दिला.
- आरपीआय आठवले गटाचे प्रथमच खाते: आरपीआय आठवले गटाने भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवत प्रथमच महापालिकेत खाते उघडले. आरपीआयचे जिल्हाध्यक्ष अनिल अडकमोल विजयी झाले.
- कमळावर महाजन दाम्पत्याचा विजय: विधानसभेत भाजप उमेदवाराविरोधात निवडणूक लढवणाऱ्या शिवसेना ठाकरे गटाच्या माजी महापौर जयश्री महाजन आणि त्यांचे पती सुनील महाजन यांनी मात्र यावेळी कमळ चिन्हावर विजय मिळवला. हा राजकीय विरोधाभासही चर्चेचा ठरला.
- थोडक्यात जळगाव महापालिका निवडणूक 2026 ही केवळ आकड्यांची लढाई न राहता घराणेशाही, नव्या चेहऱ्यांचा उदय, पक्षबदलाचे परिणाम आणि धक्कादायक विजय-पराभव यांची साक्षीदार ठरली आहे. आता या निकालातून निर्माण झालेली नवी राजकीय गणिते शहराच्या कारभाराला कोणत्या दिशेने नेणार, याकडे जळगावकरांचे लक्ष लागले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world