सध्या खरीप हंगाम सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीच्या कामांसाठी आणि ट्रॅक्टरसाठी पेट्रोल-डिझेलची नितांत आवश्यकता आहे. मात्र, जालना जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना पंपवरून इंधन मिळण्यास अडचणी येत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर, शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी आणि इंधनाचा काळाबाजार रोखण्यासाठी जालना जिल्हा प्रशासनाने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी जिल्ह्यातील सर्व पेट्रोल-डिझेल पंप धारकांसाठी कडक निर्देश जारी केले आहेत. आता शेतकऱ्यांना इंधन खरेदी करताना अधिकृत कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत.
इंधन खरेदीसाठी 'ही' दोन कागदपत्रे अनिवार्य
जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रानुसार, पेट्रोल किंवा डिझेलचा पुरवठा करताना संबंधित शेतकऱ्याची खालील दोन कागदपत्रे तपासून त्यांची पंपावरील नोंदवहीत नोंद करणे अनिवार्य राहील.
- ट्रॅक्टरचे आरसी बुकची मूळ प्रत किंवा स्वयं साक्षांकित (Self-Attested) छायाप्रत सोबत असणे आवश्यक आहे.
- अॅग्रीस्टॅक आयडी (Farmer ID) हा शासकीय शेतकरी आयडी सादर करावा लागेल.
(नक्की वाचा- LPG Cylinder: घरातील सिलेंडर 25 दिवसांच्या आत संपला तर काय कराल? 3 पर्याय ठरतील फायदेशीर)
'अॅग्रीस्टॅक आयडी' नसेल तर काय करावे?
ज्या शेतकऱ्यांकडे सध्या 'अॅग्रीस्टॅक आयडी' उपलब्ध नसेल, अशा शेतकऱ्यांनाही काळजी करण्याची गरज नाही. अशा वेळी प्रत्येक व्यवहाराच्या वेळी संबंधित शेतकऱ्याकडून काही तपशील पंपावरील रजिस्टरमध्ये लिहून घेतले जातील.
- शेतकऱ्याचे अधिकृत ओळखपत्र
- मोबाईल नंबर
- शेतकऱ्याचे संपूर्ण नाव
- शेतकऱ्याची स्वाक्षरी
तहसीलदारांचे पथक करणार तपासणी
जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, पेट्रोल पंपांवरील या विशेष नोंदवहीची तपासणी थेट संबंधित तहसीलदार यांच्या पथकामार्फत वेळेवेळी केली जाईल. या सुविधेचा कोणताही गैरवापर होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
(नक्की वाचा- Dombivli News: संतापजनक! हायप्रोफाईल सोसायटीत वृद्ध सुरक्षारक्षकाला मुजोर रहिवाशाकडून मारहाण, कारण... )
इंधनाची कोणतीही साठेबाजी, काळाबाजार अथवा अनधिकृत विक्री होणार नाही याची कटाक्षाने खबरदारी घेण्याच्या सूचना पंपांना देण्यात आल्या आहेत. तसेच, शासनाच्या नियमांनुसार अधिकृत कंटेनरचाच वापर करावा, असेही आदेशात म्हटले आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पेट्रोल पंप धारकाविरुद्ध नियमांतर्गत कडक कायदेशीर कारवाई केली जाईल.
शेतकऱ्यांसाठी तक्रार क्रमांक जारी
इंधन मिळण्यात काही अडचणी आल्यास किंवा पेट्रोल पंपाबाबत काही तक्रारी असल्यास शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाच्या 02482-225311 / 8888125312 या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केले आहे.