जाहिरात

Jalna News: कंत्राटदार 'खास' माणूस असल्यानेच नियमांना केराची टोपली? समृद्धीवरील अपघाताचे धक्कादायक सत्य उघड

Jalna Samruddhi Expressway Accident: या अपघाताने संपूर्ण जिल्हा हादरला असतानाच, आता या प्रकरणातून अनेक धक्कादायक आणि संतापजनक बाबी समोर येत आहेत.

Jalna News: कंत्राटदार 'खास' माणूस असल्यानेच नियमांना केराची टोपली? समृद्धीवरील अपघाताचे धक्कादायक सत्य उघड
Jalna News : समृद्धी महामार्गावरील अपघातानंतर मोठी गोष्ट उघड झाली आहे.
जालना:

लक्ष्मण सोळुंके, प्रतिनिधी

Jalna Samruddhi Expressway Accident: जालना जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर एका भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत 8 महिला कामगारांचा अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघाताने संपूर्ण जिल्हा हादरला असतानाच, आता या प्रकरणातून अनेक धक्कादायक आणि संतापजनक बाबी समोर येत आहेत. विशेष म्हणजे, ज्या महिंद्रा पिकअपमधून या महिलांना नेले जात होते, त्या वाहनाचा आणि कंत्राटदाराचा बेजबाबदारपणा या मृत्यूला कारणीभूत ठरल्याचे प्राथमिक तपासात दिसत आहे.

असा घडला काळजाचा थरार उडवणारा अपघात

समृद्धी महामार्गाच्या स्वच्छतेचे काम करणाऱ्या एबी इंटरप्रायजेस या कंपनीने बदनापूर तालुक्यातील केळीगव्हाण, खादगाव आणि निधोना परिसरातील महिलांना कामावर ठेवले होते. दररोजप्रमाणे बुधवारी सकाळी साधारण 15 ते 20 महिलांना महिंद्रा पिकअपमधून चॅनेल क्रमांक 352 वर सोडण्यात आले होते. 

दिवसभर काम संपल्यानंतर संध्याकाळी या महिला पुन्हा त्याच महिंद्रा पिकअपमध्ये बसत असताना, पाठीमागून येणाऱ्या एका भरधाव मालवाहू ट्रकने या उभ्या असलेल्या वाहनाला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, 7 महिलांचा जागीच मृत्यू झाला, तर मंगल शिनगारे नावाच्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने एकूण मृतांचा आकडा 8 वर पोहोचला आहे.

( नक्की वाचा : Dombivli: जामिनावर सुटला अन् थेट जत्रेत पिस्तूल काढून रिल बनवलं; डोंबिवलीच्या रिलस्टारचा पोलिसांनी उतरवला माज )

लायसन्स नाही, विमा नाही आणि आरटीओ पेपरही गायब

या अपघातानंतर झालेल्या चौकशीत अतिशय धक्कादायक माहिती समोर आली आहे. ज्या महिंद्रा पिकअपमधून या 15 पेक्षा जास्त महिलांना धोकादायक पद्धतीने नेले जात होते, त्या वाहनाच्या चालकाकडे चालक परवाना (लायसन्स) नसल्याचे समोर आले आहे. 

इतकेच नाही तर, संबंधित वाहनाचे आरटीओचे कागदपत्रे आणि वाहनाचा विमा देखील नसल्याची बाब उघड झाली आहे. नियमांची पायमल्ली करून महिलांच्या जिवाशी खेळ सुरू असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.

सुरक्षा साहित्याचा अभाव आणि रस्ते विकास महामंडळाशी कनेक्शन

एबी इंटरप्रायजेस या कंपनीने मजुरांच्या सुरक्षेच्या बाबतीत अक्षम्य दुर्लक्ष केल्याचे पाहायला मिळत आहे. महामार्गावर काम करणाऱ्या या महिलांकडे हेल्मेट, ग्लोव्हज किंवा सुरक्षेचे कोणतेही साधन उपलब्ध नव्हते. या बेजबाबदार कंत्राटामागे मोठे हितसंबंध असल्याचेही बोलले जात आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, एबी इंटरप्रायजेसचा कॉन्ट्रॅक्टर चेतन शिंदे हा रस्ते विकास महामंडळाचे (MSRDC) सचिव अनिल गायकवाड यांचा जवळचा नातेवाईक असल्याचे समोर आले आहे. उच्चपदस्थ अधिकाऱ्याशी नाते असल्यानेच कंत्राटदाराने नियमांकडे पाठ फिरवली होती का, असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे.

मदत जाहीर आणि नातेवाईकांचा संताप

या घटनेची माहिती मिळताच आमदार अर्जुन खोतकर आणि आमदार नारायण कुचे यांनी रुग्णालयात धाव घेतली. आमदार कुचे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केल्यानंतर मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 5 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. 

मात्र, संतप्त नातेवाईकांनी या मदतीवर असमाधान व्यक्त करत संबंधित कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची आणि मृतांच्या कुटुंबियांना 50 लाख रुपयांची मदत देण्याची मागणी केली आहे. सध्या जालन्यासह बदनापूर तालुक्यात या घटनेमुळे मोठी शोककळा पसरली आहे.

अपघातामधील मृतांची नावे:


1) लक्ष्मीबाई संतोष मदन - 45 वर्ष
2) कडूबाई रामदास मदन - 55 वर्ष
3) ताराबाई गहीनाथ चौधरी - 60 वर्ष
4) अलका रामदास आदमाने - 45 वर्ष
5) मीना परमेश्वर आदमाने - 45 वर्ष
6) कांचन प्रकाश आदमाने
7) सुमंबाई कचरू अदमाणे
8) मंगल शिनगारे (उपचारादरम्यान मृत्यू)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com