लक्ष्मण सोळूंखे, जालना
Jalna News : जालन्यातील भोकरदन तालुक्यातील वरुड गावात घडलेल्या एका घटनेने 1995-96 मध्ये महाराष्ट्र राज्य पाठयपुस्तक विभागाच्या दहावीच्या पुस्तकात लोकशाहीरअण्णाभाऊ साठे यांच्या 'स्मशानातील सोनं' या कथेत चितेच्या राखेत दडलेल्या सोन्याच्या हव्यासाचं चित्रण केलं होतं. वरूड बुद्रुकमध्ये घडलेल्या घटनेने त्या कथेचीच पुन्हा आठवण करून दिली आहे. अंत्यसंस्कारानंतर अस्थी संकलनासाठी गेलेल्या कुटुंबीयांना चितेची राखच गायब झाल्याचं दिसलं. या धक्कादायक प्रकाराने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
ना राख, ना अस्थी...उरली फक्त रिकामी जागा...
भोकरदन तालुक्यातील वरूड बुद्रुक गावात एका व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कुटुंबीयांनी साश्रू नयनाने चितेला अग्नी ही दिला. मात्र तिसऱ्या दिवशी राख सावडण्यासाठी आणि अस्थी संकलनासाठी स्मशानभूमीत पोहोचताच कुटुंबांना आणि नातेवाईकांना जबर धक्का बसला. चितास्थळी ना राख होती, ना अस्थी... उरली होती ती फक्त रिकामी जागा.
रात्रीच्या अंधारात कुणीतरी स्मशानभूमीत प्रवेश करून चितेवरील राख पोत्यात भरून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. या घटनेने मृताच्या कुटुंबीयांना मोठा मानसिक धक्का बसला. गावातही या घटनेने संतापाची लाट उसळली आणि चर्चाना उधाण आलं आहे. मृतदेहाच्या तोंडात अनेकदा सोन्याचा मणी ठेवला जातो. तो मिळविण्यासाठी हा प्रकार घडला असावा, अशी चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे. तर काहीजण अघोरी विद्या किंवा तांत्रिक विधींसाठी राख नेली असावी, अशीही शक्यता व्यक्त करू लागले आहेत. मात्र या चर्चांना अद्याप कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नसल्याने ही चर्चा जिल्हाभर पसरली.
स्मशानभूमीच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह...
काही दिवसांपूर्वीच याच परिसरातील पिंपळगाव रेणुकाई येथे यापूर्वीही अशाच प्रकारची घटना घडल्याची चर्चा सुरू झाल्या आणि शंका आणि कुशंकाना वाव मिळाला. चर्चा अधिक रंगू लागल्या. त्यात हा एखादा वेगळा प्रकार नसून स्मशानातील सोन्यासाठी कुणी तरी राख नेली असावी, यामागे अशा घटनांची साखळी तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला.
या घटनेमुळे स्मशानभूमींच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दोषींचा तातडीने शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे. अंधश्रद्धा, अफवा आणि मृतांच्या अवशेषांबाबतचे गैरसमज समाजाला किती भयावह वळण देऊ शकतात, याचं हे अस्वस्थ करणारं उदाहरण समोर आलं आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या "स्मशानातील सोनं" या कथेतला हव्यास आजही समाजात जिवंत आहे का? वरूड बुद्रुकमधील ही घटना अनेक अनुत्तरित प्रश्न उपस्थित करत आहे. आता या राख चोरीमागचं खरं कारण काय, याचा उलगडा होणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world