- विशाल पुजारी, प्रतिनिधी
Jyotiba Temple Viral Video: 'जोतिबाच्या नावानं चांगभलं'च्या जयघोषाने दुमदुमणाऱ्या वाडी रत्नागिरी अर्थात जोतिबा डोंगरावरील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दर्शनासाठी आलेल्या काही भक्तांना पुजाऱ्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे, या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सासनकाठी घेऊन प्रदक्षिणा घालत असताना काही तरुणांनी केलेल्या हुल्लडबाजीमुळे हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे.
कोल्हापुरातील जोतिबा मंदिरात नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी 11 वाजेपासून ते दुपारी 12 वाजेच्या सुमारास जोतिबा मंदिराच्या आवारात मुख्य आरती सुरू होती. यावेळी काही भक्त सासनकाठी घेऊन मंदिराभोवती प्रदक्षिणा घालत होते. प्रदक्षिणेदरम्यान काही तरुणांनी अतिउत्साहात हुल्लडबाजी करायला सुरुवात केली. आरतीमध्ये अडथळा निर्माण करण्यासह या तरुणांनी उपस्थित असलेल्या पुजाऱ्यांच्या अंगावर गुलाल फेकणे आणि त्यांच्या डोक्यावरील पारंपरिक टोप्या उडवण्याचे प्रकार केले. पुजाऱ्यांनी आणि देवस्थानच्या कर्मचाऱ्यांनी सुरुवातीला या तरुणांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण हुल्लडबाजी थांबत नसल्याचे पाहून संतापलेल्या पुजाऱ्यांनी काही भक्तांना पकडून मारहाण करण्यास सुरुवात केली.
(नक्की वाचा: Accident News: पुणे हळहळलं! भीषण अपघातात तिघांचा मृत्यू, मुलांच्या डोळ्यादेखत आई- वडिलांनी जीव सोडला)
मंदिरातून ओढून काढत दिला चोप
परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून काही पुजाऱ्यांनी या तरुणांना अक्षरशः मंदिरातून ओढून बाहेर काढले आणि चोप दिला. मारहाणीच्या भीतीने काही तरुण सैरावैरा पळू लागले होते, पण त्यांना शोधून काढून पुन्हा मारहाण करण्यात आली. या घटनेमुळे मंदिर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते आणि इतर भाविकांमध्येही भीती पसरली होती.
(नक्की वाचा: Satara News: मोठी बातमी! सातारा जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या निलंबनाचे आदेश; झेडपी निवडणुकीचा राडा भोवला)
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर संताप
या संपूर्ण मारहाणीचा व्हिडीओ कोणातरी आपल्या मोबाइलमध्ये कैद केला आणि तो सोशल मीडियावर अपलोड केला. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही लोक पुजाऱ्यांच्या कृतीचा निषेध करत आहेत, तर काही जण धार्मिकस्थळी हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांना धडा शिकवणं गरजेचं आहे, असे मत व्यक्त करत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world