
प्रतिनिधी, अमोल गावंडे
खाऱ्या पाण्याच्या अनोख्या विवरामुळे जगाच्या नकाशावर लोणार सरोवराचे नाव कोरले गेले आहे. हजारो वर्षांपासून लोणार अर्थात उल्कानगरी एक आश्चर्य ठरली आहे. या ठिकाणावर नेहमीच अद्भूत गोष्टींचा उलगडा होत गेला आहे. प्राचीन स्थापत्यकलेचा अद्भुत नमूना असलेल्या दैत्यसुदन मंदिरात चार दिवसांपासून होत असलेल्या विस्मयकारक किरणोत्सवामुळे लोणार पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. 14 ते 19 मेपर्यंत सलग चार दिवसांपासून भगवान विष्णूच्या मूर्तीला सूर्यकिरणांचा अभिषेक होत आहे. 19 तारखेपर्यंत सूर्यकिरणांचा हा सोहळा भाविकांना तब्बल दहा मिनिटे अनुभवायला मिळलाय.
अख्ख्या विश्वाला भुरळ घालणाऱ्या लोणार सरोवराच्या काठी वसलेल्या शहराला या किरणोत्सवामुळे एक वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. यामुळे उल्कानगरीच्या कुतूहलात आणखी भर पडलीय. लोणार शहरासह सरोवराला ऐतिहासिक, आध्यात्मिक वारसा लाभलेला आहे. वैज्ञानिकदृष्ट्याही ही भूमी महत्त्वपूर्ण आहे.
नक्की वाचा - प्रतिक्षा संपणार! मान्सून अंदमानात दाखल होणार तर 31 मे ला केरळात बरसणार
लोणार शहरात दैत्यसुदन मंदिरात भगवान विष्णूची पायाखाली लवणासूर राक्षसाचा वध करतानाची मूर्ती आहे. मूर्तीच्या ललाटी म्हणजेच दैत्यसुदनाच्या मस्तकी 14 मेपासून सूर्यकिरणांचा एकप्रकारे अभिषेकच होत आहे. ही किरणे मूर्तीला आल्हाददायी स्पर्शाने भाविकांना सुखद अनुभूती देत आहेत. 14 ते 19 मे या कालावधीत सूर्यकिरणांचा हा उत्सव दहा मिनिटे सुरू असतो. हे मनोहारी दृश्य पाहण्यासाठी भाविक व पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world