
विशाल पुजारी, प्रतिनिधी
कोल्हापूर महापालिकेतर्गत ड्रेनेज कामातील घोटाळ्याप्रकरणी तीन अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याय आली आहे. कसबा बावडा येथील 85 लाखांच्या कामाची चौकशी व्हावी अशी एका नेत्यान केली. त्यानंतर या प्रकरणातील ठेकेदाराने अधिकाऱ्यांनी टक्केवारीनुसार अधिकाऱ्यांनी पैसे घेतले असा आरोप केला. ठेकेदाराच्या आरोपांनंतर याप्रकरणी महापालिका प्रशासकांनी याची चौकशी सुरु केली. यामध्ये संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
कसबा ड्रेनेजलाईन न टाकताच तब्बल 85 लाख रुपयांची बिले काढल्याच्या बहुचर्चित प्रकरणात कोल्हापूर महापालिका प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी अखेर कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. या गंभीर प्रकरणात मंगळवारी कनिष्ठ अभियंता प्रज्ञा गायकवाड, पवडी अकाऊंटंट बळवंत सूर्यवंशी आणि वरिष्ठ लिपिक जयश्री हंकारे या तिघांना निलंबित करण्यात आले. या कारवाईमुळे महापालिका वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या घोटाळ्याची व्याप्ती केवळ निलंबनापुरती मर्यादित राहिलेली नाही. प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी या प्रकरणात जबाबदार असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही कारवाईचे आदेश दिले आहेत. यामध्ये अनेक विद्यमान आणि सेवानिवृत्त अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
नक्की वाचा - Kolhapur News: बाहुली,गुलाल अन् लोखंडी खिळे! सोडचिट्टीसाठी स्मशानभूमीत काळी जादू
कोल्हापूर महापालिकेत न केलेल्या कामाचे 85 लाख रुपयांचे बिल उचलल्याचा आरोप माजी नगरसेवक सत्यजित कदम यांनी पत्रकार परिषदेत केल्यानंतर महापालिकेत एकच खळबळ उडाली. दोन तासांच्या आतच ठेकेदार श्रीप्रसाद वराळे याने बोगस सह्या करून, मी हे बिल उचलल्याचे कबुलीपत्र महापालिकेला दिले. त्यानंतर याप्रकरणी महापालिका प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी फौजदारी करण्याचा आदेश देताच ठेकेदार श्रीप्रसाद वराळे याने घूमजाव करत कोणत्या अधिकाऱ्याने बिल घेण्यासाठी किती पैसे घेतले, याची यादीच जाहीर केली.
कनिष्ठ अभियंता प्रज्ञा गायकवाड यांना ऑनलाईन पैसे दिल्याचा स्क्रीनशॉटदेखील त्याने सोशल मीडियावर व्हायरल केला. महापालिकेतील घोटाळ्याचे हे प्रकरण राज्यभर गाजले. दोनच दिवसांपूर्वी ठेकेदार श्रीप्रसाद वराळे याच्यावर फौजदा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या पाच ते सहा दिवसांत झालेल्या विविध घडामोडींनंतर मंगळवारी सायंकाळी महापालिका प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी या प्रकरणात दोषी धरून कनिष्ठ अभियंता प्रज्ञा गायकवाड, पवडी अकाऊंटंट बळवंत सूर्यवंशी, वरिष्ठ लिपिक जयश्री हंकारे या तिघांना निलंबित केले आहे. तर मुख्य लेखापरीक्षक कलावती मिसाळ, वरिष्ठ लेखापरीक्षक सुनील चव्हाण यांची शासनामार्फत विभागीय चौकशी होणार असून, निवृत्त शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, उपशहर अभियंता रमेश कांबळे या दोघांची खातेनिहाय चौकशी होणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world