जाहिरात

Kolhapur News : बायकोला फसवून तिसरं लग्न महागात पडलं, पोलीस अधिकारी थेट निलंबित

Kolhapur News : पोलीस उपनिरीक्षक इम्रान मुल्ला यांचा आफ्रीन मुल्ला यांच्याशी 2019 च्या दरम्यान निकाह झाला होता. यावेळी इम्रान मुल्ला गोंदिया येथे सेवा बजावत असताना तक्रारदार आफ्रीन मुल्ला यांच्यासोबत सातत्याने वाद होत होते.

Kolhapur News : बायकोला फसवून तिसरं लग्न महागात पडलं, पोलीस अधिकारी थेट निलंबित

विशाल पुजारी, कोल्हापूर

एका पोलीस अधिकाऱ्यान बायकोच्या माघारी चक्क तीन लग्न करून फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या पोलिसावर त्याच्या कारनाम्यामुळे निलंबनाची कारवाई झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकावर ही कारवाई करण्यात आली आहे. 

याबाबत अधिक माहितीनुसार, कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक इम्रान मुल्ला यांच्या पत्नी आफ्रिन मुल्ला यांनी कराड पोलिसांत तक्रार दिलेली. या तक्रारीनुसार इम्रान मुल्ला यांनी पोलीस उपनिरीक्षकाचे पहिले लग्न झाले असताना ती माहिती लपवून बेकायदेशीररित्या दुसरे लग्न केले. सातत्याने वाद होत असताना तिसरे लग्न केले. आता बायकोने केलेल्या पाठपुराव्यानंतर अखेर कोल्हापूर पोलिसांनी इम्रान मुल्ला याला निलंबित केल्याचा आदेश काढला आहे. 

(वाचा- Solapur Crime News : प्रेम संबंधाला विरोध, मुलानेच प्रेयसीच्या मदतीने घेतला आईचा जीव)

पोलीस उपनिरीक्षक इम्रान मुल्ला यांचा आफ्रीन मुल्ला यांच्याशी 2019 च्या दरम्यान निकाह झाला होता. यावेळी इम्रान मुल्ला गोंदिया येथे सेवा बजावत असताना तक्रारदार आफ्रीन मुल्ला यांच्यासोबत सातत्याने वाद होत होते. शारीरिक आणि मानसिक छळ होत असल्याने आफरीन मुल्ला यांनी गोंदियातील केशारी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला होता. गुन्हा नोंद झाल्यानंतर इम्रान मुल्ला यांना सेवेतून निलंबित करण्यात आले होते. दरम्यान पत्नी आफ्रीन मुल्ला यांनी पाठपुरावा केल्यानंतर 2015 साली इम्रान मुल्ला यांचे पहिले लग्न झाले असल्याची माहिती मिळाली. मात्र कायदेशीररित्या घटस्फोट न झाल्याची माहिती न देता इम्रान मुल्ला यांनी आफ्रीन मुल्ला यांच्याशी विवाह केल्याचे समोर आले. 

तिसरं लग्न केल्याची माहिती मिळाल्यानंतर कराड पोलिसात गुन्हा नोंद

पोलीस उपनिरीक्षक मुल्ला यांनी इतक्यावरच न थांबता 23 जून 2024 रोजी तिसरे लग्न केल्याची माहिती आफ्रीन मुल्ला यांना मिळाली. आपल्यासोबत कायदेशर रित्या तलाक न झाल्याने त्यांनी कराड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. मात्र कोणतेही कारवाई होत नसल्याने अखेर माहिती अधिकारात पोलीस प्रशासनाशी पाठपुरावा केला. यानंतर इम्रान मुल्ला यांच्याकडे चौकशी केली असता, सुहाना कुमार हिच्याशी माझं लग्न झालेलं नाही ती माझी मैत्रीण आहे, असा खुलासा त्यांनी केला होता. तर आफ्रीन मुल्ला हीच आपली पहिली पत्नी असल्याचं स्पष्टीकरण दिले होतं.

(नक्की वाचा- "परतफेड करेन तेव्हा डिलिट करणार", नितशे राणेंना 'तो' व्हिडीओ आजही मोबाईलमध्ये सेव्ह करुन ठेवलाय)

तिहेरी तलाकची नोटीस पाठवून लग्न केल्याची माहिती?

मुस्लीम कायद्यानुसार तिहेरी तलाकाची कायदेशीर नोटीस पाठवून आपण लग्न केल्याची माहिती देखील चौकशी दरम्यान इम्रान मुल्ला यांनी दिली आहे. त्यामुळे तिसरं लग्न मी कायदेशीररित्या केल्याची माहिती देखील यावेळी देण्यात आली. पोलिसांनी केलेल्या या तपासानंतर इम्रान मुल्ला यांचे सुहाना कुमार हिच्याशी घनिष्ठ संबंध असल्याचे आता उघड झाले आहे. शिवाय एका प्रकरणात सुहाना कुमार यांनी इम्रान मुल्ला यांच्याशी लग्न झाल्याची कबुली देण्यात आल्याची माहिती अहवालात दिली आहे. दरम्यान इम्रान मुल्ला आणि आफ्रीन मुल्ला यांच्यातील तलाक प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. त्यामुळे इम्रान मुल्ला यांनी आतापर्यंत तीन वेळा लग्न केल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे पोलीस दलाची बदनामी झाल्याचे स्पष्ट करत आज इम्रान मुल्ला यांना सेवेतून निलंबित करण्यात आल्याचा आदेश काढण्यात आला आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: