विशाल पुजारी, प्रतिनिधी
Kolhapur News : कोल्हापुरात ड्युटीवर असलेला एक वैद्यकीय अधिकारी मद्यधुंद अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. पन्हाळा ग्रामीण रुग्णालयात शनिवारी रात्री हा धक्कादायक प्रकार घडला. दिगंबर टोणपे असं या अधिकाऱ्याचं नाव आहे. पन्हाळगडावरील एका रुग्णाला अचानक चक्कर आल्यामुळे त्याचे नातेवाईक तातडीने पन्हाळा ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले होते. यावेळी हा अधिकारी नशेत असल्याचं निदर्शनास आलं. दरम्यान संतप्त नातेवाईकांनी या अधिकाऱ्याचं चित्रीकरण केलं. त्यानंतर रुग्णाला कोल्हापूरला नेण्यात आलं. या व्हिडिओतील दृश्यानुसार हा संपूर्ण प्रकार संतापजनक असल्याचं दिसून येत आहे.
रुग्णालयातील संतापजनक प्रकार...
कोल्हापुरातील पन्हाळा ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय सेवेबाबत गंभीर निष्काळजीपणाचा धक्कादायक प्रकार मानला जात आहे. शनिवारी रात्री ड्युटीवर असलेले वैद्यकीय अधिकारी दिगंबर टोणपे हे मद्यधुंद अवस्थेत आढळून आल्याने रुग्णसेवेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गडावरील एका रुग्णाला अचानक चक्कर आल्यामुळे त्याचे नातेवाईक तातडीने पन्हाळा ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले मात्र, त्या वेळी ड्युटीवरील वैद्यकीय अधिकारी मद्यपान करून इतक्या गंभीर अवस्थेत होते की, त्यांना व्यवस्थित बोलताही येत नव्हते. या परिस्थितीत रुग्णावर प्राथमिक उपचार नर्सिंग स्टाफने केले. पुढील उपचारासाठी रुग्णाला तातडीने कोल्हापूर येथे हलवण्याचा सल्ला देण्यात आला. दरम्यान, संतप्त नातेवाईकांनी संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्याचा व्हिडिओ देखील चित्रीत केला आहे.
या घटनेमुळे पन्हाळा ग्रामीण रुग्णालयाच्या व्यवस्थापनावर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून अशा मद्यधुंद अधिकाऱ्यांच्या हवाली रुग्णांचा जीव सोपवायचा का?” असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. सदर प्रकाराची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी पन्हाळा वासियांकडून जोर धरत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world