अमोल सराफ, बुलडाणा
बुलढाणा जिल्ह्यातून एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शासनाची फसवणूक करून 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेचा लाभ घेणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांवर प्रशासनाने आता कारवाईचा बडगा उगारला आहे. बुलढाणा जिल्हा प्रशासनाने अशा कर्मचाऱ्यांकडून घेतलेल्या लाभाची संपूर्ण रक्कम वसूल केली असून, त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई देखील प्रस्तावित केली आहे.
राज्य सरकारची अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेल्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेत पात्रतेचे निकष धाब्यावर बसवून लाभ घेणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांचे पितळ उघडे पडले आहे. बुलढाणा जिल्ह्यात कार्यरत असलेल्या अशा 6 कर्मचाऱ्यांवर जिल्हा प्रशासनाने दंडात्मक कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे.
(नक्की वाचा- Holiday News: राज्यातील 29 शहरांमध्ये 15 जानेवारीला सुट्टी जाहीर; वाचा शहरांची संपूर्ण यादी)
196 कर्मचाऱ्यांची झाली होती पडताळणी
शासनाकडून महिला व बालविकास विभागाला बुलढाणा जिल्ह्यातील विविध विभागांत कार्यरत असलेल्या 196 संशयास्पद कर्मचाऱ्यांची यादी प्राप्त झाली होती. या यादीची सखोल चौकशी केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली. तपासात असे आढळले की, 190 कर्मचारी हे अर्धवेळ काम करणारे होते आणि त्यांचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याने ते निकषांनुसार पात्र ठरले. उर्वरित 6 कर्मचारी हे पूर्णवेळ शासकीय कर्मचारी असूनही त्यांनी आपली माहिती लपवून योजनेचा लाभ घेतला होता.
99 हजार रुपयांची वसुली
या ६ अपात्र शासकीय कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत प्रत्येकी 16,500 रुपये इतका लाभ लाडकी बहीण योजनेतून घेतला होता. प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेत या सर्व सहाही कर्मचाऱ्यांकडून एकूण 99 हजार रुपयांची रक्कम वसूल केली आहे. घेतलेल्या लाभाची वसुली केल्यानंतर आता त्यांच्यावर विभागीय चौकशी आणि प्रशासकीय कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.
(नक्की वाचा- Ambarnath News: अंबरनाथमध्ये काँग्रेसला भगदाड, शिंदे गट बॅकफूटवर; काँग्रेसच्या 12 नगरसेवकांचा मोठा निर्णय)
जिल्हा परिषदेच्या CEO कडे प्रस्ताव सादर
जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रमोद येंडोले यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे (CEO) रीतसर प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. शासनाची दिशाभूल आणि फसवणूक केल्याप्रकरणी या कर्मचाऱ्यांवर पुढील काही दिवसांत मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे.