सुनिल कांबळे, प्रतिनिधी: लातूरमधून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. लातूरच्या उदगीर तालुक्यात कार आणि आयशरचा मोठा अपघात झाला. या दुर्घटनेत चार जणांचा दुर्दैवी अंत झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या मन सुन्न करणाऱ्या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
भीषण अपघात, चौघांचा अंत
याबाबत सविस्तर माहिती अशी की, लातूरच्या उदगीर तालुक्यात कार आणि आयशर ट्रकचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. उदगीर तालुक्यातील वाढवणाच्या एकुरका येथील मंदिराजवळ हा अपघात झाला. कारमधील चौघांचा दुर्दैवी अंत झाला तर तीन जण गंभीर जखमी झालेत. मृतांमध्ये तीन महिलांसह एका चिमुकलीचा समावेश आहे. अपघातात मृत्यू झालेले सर्वजण एकाच कुटुंबातील असल्याचे सांगण्यात येत आहे. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
आईसह, तीन मुली अन् नातीचा समावेश
समोर आलेल्या माहितीनुसार, एकुर्का येथील जाधव कुटुंबीय आपल्या स्विफ्ट कारने खरेदीसाठी उदगीरला निघाले होते. यावेळी नांदेड- बिदर महामार्गावर भरधाव वेगात येणाऱ्या आयशरने त्यांच्या कारला जोराची धडक दिली. ही धडक इतकी भयंकर होती की कारमधील चौघांचा जागीच मृत्यू झाला. मंगल जाधव, ज्योती भेंडे, प्रणिता बिरादार अशी मृतांची नावे असून एका चिमुकलीचाही समावेश आहे. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.