त्रिशरण मोहगावकर, लातूर
लातूर जिल्ह्यातील अहमदपूर शहरातून अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक बातमी समोर आली आहे. नवनिर्वाचित नगरसेविका शाहूताई कांबळे यांचा वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. एका लोकप्रतिनिधीला उपचारासाठी पहाटे तासभर वणवण फिरावे लागल्याने अहमदपूरमधील आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत.
काय घडली नेमकी घटना?
शाहूताई कांबळे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेविका होत्या. आज पहाटेच्या सुमारास त्यांच्या छातीत अचानक दुखू लागले. नातेवाईकांनी त्यांना तातडीने उपचारासाठी नेले. मात्र पहाटेची वेळ असल्याने शहरातील अनेक खासगी रुग्णालयांचे दरवाजे फिरूनही त्यांना वेळेत डॉक्टर मिळू शकले नाहीत.
(नक्की वाचा- Holiday News: राज्यातील 29 शहरांमध्ये 15 जानेवारीला सुट्टी जाहीर; वाचा शहरांची संपूर्ण यादी)
तब्बल एक तास नातेवाईक त्यांच्या उपचाराच्या शोधात शहरात फिरत राहिले. शेवटी कोणताच पर्याय न उरल्याने त्यांना शासकीय ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. शासकीय रुग्णालयात पोहोचताच, उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. जर त्यांना 15-20 मिनिटे आधी उपचार मिळाले असते, तर कदाचित त्यांचे प्राण वाचले असते, अशी हळहळ व्यक्त होत आहे.
सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांना मोठा धक्का
शाहूताई कांबळे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या निष्ठावान कार्यकर्त्या होत्या. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी स्वतः पुढाकार घेऊन त्यांना उमेदवारी दिली होती आणि त्यांना निवडून आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले होते. अगदी मध्यमवर्गीय कुटुंबातील सदस्य असलेल्या शाहू ताई कांबळे या त्यांच्या प्रभागातील नागरिकांच्या समस्या साठी कायम रस्त्यावर उतरलेल्या दिसायच्या.
(नक्की वाचा- BMC Election: वडाळ्यात 'भाऊ'ची एन्ट्री! अभिनेते भाऊ कदम यांचा ठाकरेंच्या या उमेदवाराला जाहीर पाठिंबा)
2017 च्या निवडणुकीमध्ये सुद्धा शाहूताई कांबळे यांना धन दांडगे यांच्या लढाईत अवघ्या 12 मतांनी पराभव स्वीकारला लागला होता. त्यांच्या कामाची धडाडी आणि प्रभागातील मतदारांचा त्यांच्या वरती असलेला विश्वास पाहून सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी विशेष लक्ष घालून शाहुताई कांबळे यांना निवडून आणणारच असा चंग बांधून प्रचारादरम्यान वार्ड क्रमांक दोन मध्ये वारंवार भेटी देत शाहू ताई कांबळे यांना निवडून आणले होते. या घटनेची माहिती मिळताच बाबासाहेब पाटील यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. "हा माझ्यासाठी आणि पक्षासाठी खूप मोठा वैयक्तिक धक्का आहे," अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.