जाहिरात

Congress MLA: आणखी एक बाबा सिद्दीकी? बिश्नोई गँगच्या धमकीची काँग्रेस आमदारानं विधानसभेत दिली A to Z माहिती

Lawrence Bishnoi Gang Threatens Congress MLA : राष्ट्रवादीचे दिवंगत नेते बाबा सिद्दिकी यांच्याप्रमाणेच तुझाही गेम करू, असा थरारक इशारा या धमकीत देण्यात आल्याचा गंभीर खुलासा स्वतः आमदारांनी थेट विधानसभेत केला.

Congress MLA: आणखी एक बाबा सिद्दीकी? बिश्नोई गँगच्या धमकीची काँग्रेस आमदारानं विधानसभेत दिली A to Z माहिती
Bishnoi Gang Threatens Congress MLA : काँग्रेस आमदारांनीच ही माहिती विधानसभेत दिली.
अकोला:

योगेश शिरसाट, प्रतिनिधी 

Lawrence Bishnoi Gang Threatens Congress MLA : अकोल्यातील काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांना थेट  लॉरेन्स बिश्नोई गँगकडून पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी आल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रवादीचे दिवंगत नेते बाबा सिद्दिकी यांच्याप्रमाणेच तुझाही गेम करू, असा थरारक इशारा या धमकीत देण्यात आल्याचा गंभीर खुलासा स्वतः आमदारांनी थेट विधानसभेत केला आहे. 

काय आहे प्रकरण?

विधानसभेत आपला मुद्दा मांडताना काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांनी अत्यंत गंभीर आरोप केले. 1 जुलै रोजी सायंकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास त्यांना बिश्नोई गँगशी संबंधित असलेल्या शुभम लोणकर नावाच्या व्यक्तीचा धमकीचा फोन आला. शुभम लोणकर हा अकोल्यापासून अवघ्या 10 ते 15 किलोमीटर अंतरावर राहणारा असून त्याने यापूर्वीही धमकी दिली होती. 

या नव्या फोनमध्ये बिश्नोई गँगच्या माणसांनी थेट 10 कोटी रुपयांची खंडणी मागितली असून, पैसे न दिल्यास हाल हाल करून मारण्याची धमकी दिली आहे. बाबा सिद्दिकी यांच्यासारखाच माझाही काटा काढण्याचा विचार त्यांचा असेल, तर सरकार काय करत आहे, असा संतप्त सवाल आमदारांनी उपस्थित केला.

( नक्की वाचा : Akola News: भूखंडाच्या फाईलसाठी मागितली लाच अन् थेट ACB नं आवळल्या मुसक्या; अकोल्यातील बड्या अधिकाऱ्याला अटक )

पठाण झाले भावूक

धमकीच्या या संपूर्ण प्रकारावर बोलताना आमदार साजिद खान पठाण यांनी अत्यंत भावनिक आणि टोकदार भूमिका घेतली. मी अशा धमक्यांना अजिबात घाबरत नाही, मी घर सोडून येथे जनतेचे मुद्दे मांडायला आलो आहे, असे ते म्हणाले. बाबा सिद्दिकींसारख्या माझ्यावर गोळ्या झाडल्या तरी चालतील, पण मला मारण्याआधी माझी अंतिम इच्छा म्हणून अकोल्यातील राजेश्वर महाराज मंदिराच्या विकासासाठी सरकारने निधी द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. 

पहिल्यांदा धमकी आली तेव्हा स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी रात्री 12 वाजता फोन करून सोबत असल्याचे सांगितले होते, पण नंतर सुरक्षा देण्याचे आश्वासन हवेतच विरले, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. काँग्रेस आमदार भाई जगताप यांनीही या मुद्द्यावरून सरकारला घेरले आणि काल आलेल्या धमकीचे रेकॉर्डिंग एका पेनड्राइव्हमध्ये आणले असून ते सभागृहाला सुपूर्द करत असल्याचे सांगितले.

( नक्की वाचा : मातोश्रीचा 'थिंक टँक' गाफील राहिला अन् शिंदेंनी गेम केला; विधीमंडळातील 'त्या'कागदाने फिरवले राज्याचे राजकारण )
 

गृहराज्यमंत्र्यांची मोठी घोषणा

या गंभीर प्रकरणाची दखल घेत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सभागृहात तात्काळ मोठी घोषणा केली. मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदारांना सुरक्षा देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र त्याची अंमलबजावणी होऊ शकली नव्हती. आता काल पुन्हा धमकी आल्यामुळे गृहराज्यमंत्र्यांनी स्पष्ट आदेश दिले की, कोणत्याही लोकप्रतिनिधीची सुरक्षा आमच्यासाठी सर्वात महत्त्वाची आहे. त्यानुसार आमदार साजिद खान पठाण यांना पुढील 24 तासांच्या आत वाय (Y) दर्जाची सुरक्षा पुरवली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. या संपूर्ण प्रकरणानंतर अकोला आणि मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com