2 hours ago

विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यात शरद पवारांनी जयंत पाटील हे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार असतील असे संकेतच दिले आहेत. तर दुसरीकडे महायुतीत जागा वाटपांच्या हालचालींना वेग आला आहे. शिवाय मनोज जरांगे पाटील हे ही मराठा समाजातील 800 इच्छुकांच्या आज मुलाखती घेणार आहेत. विधानसभा निवडणुकीत उतरायचे की नाही याबाबतचा चर्चाही  या निमित्ताने होत आहे. वंचितने आपली उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. अशा वेळी अन्य कोणत्या पक्षाची उमेदवारी यादी जाहीर होणार का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले असेल. 
 

Oct 17, 2024 15:32 (IST)

नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसची उमेदवारी जाहीर

नांदेड लोकसभा पोटनिवडणूकीसाठी काँग्रेसने आपला उमेदवार जाहीर केला आहे. पक्षाने  रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी दिली आहे. रवींद्र चव्हाण हे  दिवंगत खासदार वसंत चव्हाण यांचे पुत्र आहेत.

Oct 17, 2024 13:05 (IST)

भाजपचे विद्यमान आमदार राहुल आहेर यांची निवडणुकीतून माघार

चांदवड- देवळा मतदार संघाचे विद्यमान आमदार राहुल आहेर यांनी आगामी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यांना आपले मोठे बंधू नाफेड संचालक केदानाना आहेर यांच्या नावाची  शिफारस वरिष्ठांकडे केली आहे. भाजप श्रेष्टींनीही त्यांनी विनंती मान्य केल्याचे राहुल आहेर यांनी सांगितले. शिवाय कुटुंबात वाद नको यासाठी आपण हा निर्णय घेतल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे केदानाना आहेर यांचा उमेदवारी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

Oct 17, 2024 12:40 (IST)

आप महाराष्ट्र विधानसभा लढवणार नाही

आम आदमी पक्षाने महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लढणार नसल्याचे समोर येत आहे. झारखंडमध्ये देखील आप निवडणूक लढवणार नाही. आप दिल्लीतील विधानसभा निवडणुकीवर फोकस करणार आहे. शिवाय मतांची विभागणी टाळण्यासाठी हा निर्णय घेतला गेला आहे. INDIA आघाडीतील घटक पक्षांच्या दबावापोटी आम आदमी पक्षाने हा निर्णय घेतला आहे का याची आता चर्चा सुरू झाली आहे. 

Oct 17, 2024 10:53 (IST)

टीम इंडियाची खराब सुरुवात

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात बेंगळुरुमध्ये सुरु असलेल्या टेस्टमध्ये भारताची खराब सुरुवात झाली. टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा फक्त 2 रन काढून आऊट झाला. तिसऱ्या क्रमांकावर खेळायला आलेला विराट कोहली खातं न उघडताच शून्यावर परतला. सर्फराज खानलाही खातं उघडण्यात अपयश आलं. टीम इंडियाची पहिल्या तासाभरातच 3 आऊट 13 अशी बिकट अवस्था झाली होती.

Advertisement
Oct 17, 2024 10:12 (IST)

काँग्रेसच्या संभाव्य 17 उमेदवारांची नावे आली समोर

काँग्रेसची पहिली यादी लवकरच जाहीर होईल पहिल्या यादी सतरा जणांची नावे असण्याची शक्यता आहे. त्यात प्रदेशाध्यक्ष  नाना पटोले यांना साकोली तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण कराड, बाळासाहेब थोरात  संगमनेर, तर विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी चिमूरमधून उमेदवारी मिळणे जवळपास निश्चित मानले जात आहे. या शिवाय अमित देशमुख ,यशोमती ठाकूर, विश्वजित कदम, कुणाल पाटील, धीरज देशमुख, विकास ठाकरे, सुरेश वरपूडकर, संग्राम थोपटे, अस्लम शेख, अमिन पटेल, नसीम खान, रणजित कांबळे आणि अमित झनक यांचा समावेश पहिल्या यादीत असू शकतो. 

Oct 17, 2024 10:06 (IST)

ठाकरेंच्या सर्व आमदारांची आज मातोश्रीवर बैठक

उद्धव ठाकरे यांनी आज संध्याकाळी 6 वाजता सर्व आमदारांची बैठक बोलावली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. 

Advertisement
Oct 17, 2024 09:30 (IST)

राज्यात आचारसंहिता भंगाचा पहिला गुन्हा दाखल

लातूर जिल्ह्यात आचारसंहिता भंगाचा पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपसरपंचाच्या मुलावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जातीवाचक व धर्मविरोधी भाष्य करून पोस्ट व्हायरल केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे. 

Oct 17, 2024 08:44 (IST)

ठाकरेंच्या वरळी मतदार संघात मतदारांचा निवडणुकीवर बहिष्कार

मुंबईतील वरळी येथील बी.डी.डी. चाळ क्रमांक 1 ते 7 मधील रहिवाश्यांनी  महाराष्ट्र शासन आणि म्हाडाच्या घरकुल  वितरणावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यातून विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. रहिवाशांनी ठिकठिकाणी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार  असे बॅनर लावले आहेत. कोणत्याही राजकीय पक्षांनी मत मागण्यासाठी इमारतीत येऊ नये, असा कडक इशारा दिला आहे. 

Advertisement
Oct 17, 2024 07:46 (IST)

बोरिवलीत आमदार सुनिल राणेंचा पत्ता कट होणार ?

बोरिवली मतदारसंघातून गोपाळ शेट्टी विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत. त्यांनी उमेदवारी मिळावी अशी मागणी केली जात आहे. भाजपच्या दिल्लीतील बैठकीत याबाबत चर्चा झाली आहे. लोकसभेत गोपाळ शेट्टींचे तिकीट कापले होते. त्यामुळे त्यांचे  पुर्नवसन करण्याची मुंबईतील नेत्यांची विनंती आहे. 

Oct 17, 2024 07:44 (IST)

सुजय विखेंच्या नावावर भाजपची फुली

संगमनेर विधानसभा मतदार संघातून माजी खासदार सुजय विखे पाटील निवडणूक लढवण्याची तयारी केली होती. पण पक्षाकडून सुजय यांच्या नावाचा उमेदवारीसाठी विचार करण्यात आलेला नाही. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात सुजय विखे निवडणूक लढणार होते. एकाच घरात 2 तिकीट नको म्हणून पक्षाने निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. 

Oct 17, 2024 07:42 (IST)

अंतरवाली सराटीत विधानसभा निवडणूकीसाठी इच्छूकांची बैठक

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा लढण्यास जे इच्छुक आहेत अशा उमेदवारांची बैठक आयोजित केली आहे. ही बैठक अंतरवाली सराटीत होत आहे. जवळपास 800 जणांनी निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे.  

Oct 17, 2024 07:40 (IST)

भाजपची पहिली यादी कोणत्याही क्षणी जाहीर होणार

भाजप केंद्रीय निवडणूक समितीची बैठक दिल्लीत पार पडली. या बैठकीत 103 जागांवर चर्चा झाल्याची माहिती आहे. भाजपची पहिली यादी कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकते. पहिल्या यादीत 60  ते 70 उमेदवारांची नावं असू शकतात. यात  विद्यमान मंत्री आणि ज्येष्ठ नेत्यांची नावे असण्याची शक्यता आहे.  

Oct 17, 2024 07:38 (IST)

वाळव्याचा माणूस वर्षावर जणार - अमोल कोल्हे

उठा उठा निवडणूक आली, आता गद्दारांना घरी बसवण्याची पवारवेळ आली असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. तसेच यावेळी त्यांनी जयंत पाटील मुख्यमंत्री होणार असल्याचा दावा देखील केला आहे. वाळव्याचा माणूस वर्षावर जावा अशी इच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली. त्यामुळे मविआत आता मुख्यमंत्रिपदावरून रस्सीखेच सुरू झाली आहे.  

Oct 17, 2024 07:36 (IST)

जयंत पाटलांमध्ये महाराष्ट्र सांभाळण्याची आणि पुढे नेण्याची दृष्टी- शरद पवार

जयंत पाटलांमध्ये महाराष्ट्र सांभाळण्याची आणि पुढे नेण्याची दृष्टी शक्ती आहे असे सुचक विधान शरद पवारांनी केले आहे. पवार म्हणाले मला आनंद आहे की, आजच्या पिढीला जयंतरावसारख्या नेतृत्वाने उद्याचा महाराष्ट्र घडवण्याच्यासाठी, सावरण्यासाठी भूमिका आपल्या खांद्यावर घ्यावी. ही तुमची, माझी आणि संपूर्ण महाराष्ट्राची अपेक्षा आहे. त्या अपेक्षेच्या पूर्ततेला तुम्हा सगळ्यांची शक्ती असेल" असे वक्तव्य करत पवारांनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.