Maharashtra News : लोको पायलट, वॉर्डबॉय अन् मुलांसाठी झटणारी आई; राज्यातील तीन हृदयद्रावक घटनांनी चिंता वाढली

महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यांमधून तीन आत्महत्यांच्या घटनांनी महाराष्ट्र हादरला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
AI Image

महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यांमधून तीन आत्महत्यांच्या घटनांनी महाराष्ट्र हादरला आहे. यानिमित्ताने पुन्हा एकदा मानसिक आरोग्याबाबत चर्चा सुरू झाली आहे. बीड, पिंपरी आणि नागपूरमधून या घटना समोर आल्या आहेत. टोकाचं पाऊल उचलणाऱ्यांमध्ये वॉर्डबॉय, लोको पायलट आणि एका महिलेचा समावेश आहे. 

वॉर्डबॉयने संपवली जीवनयात्रा...

पिंपरी येथील नेहरूनगर परिसरात एका ३५ वर्षीय वॉर्डबॉयने कीटकनाशक पिऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी घडली. संदीप राघोजी नलवडे असं मृत व्यक्तीचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संदीप नलवडे स्व.यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात वॉर्डबॉय म्हणून कार्यरत होते. त्यांना दारूचं व्यसन होतं. शुक्रवारी घरात झालेल्या वादातून त्यांनी दारूच्या नशेत तब्बल एक लिटर कीटकनाशक प्राशन केले. प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. संत तुकाराम नगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास आव्हाड यांनी घटनेची पुष्टी केली असून घरगुती भांडणातून हे टोकाचं पाऊल उचलल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Advertisement

नक्की वाचा - 'त्या' एका तासात सर्वच गमावलं, रात्री 2.00 वाजता आईच्या फोनने मुलाचा थरकाप; अहिल्यानगरमध्ये भयंकर घडलं


मुलांच्या शिक्षणासाठी शहरात राहणाऱ्या महिलेने उचललं टोकाचं पाऊल 

बीडमधील अंबाजोगाई शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पठाण मांडवा रोड परिसरात एका महिलेने तिसऱ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केल्याची घटना घडली. या भीषण प्रकारात महिलेचा जागीच मृत्यू झाला असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई शहर पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा करत तपासाला सुरुवात केली. दरम्यान, मृत महिलेची ओळख पटली असून वैशाली सुनिल चिकटकर असे या मृत महिलेचे नाव आहे. ही महिला मूळची जवळगाव येथील रहिवासी आहे. मुलांच्या शिक्षणासाठी ती अंबाजोगाईत भाड्याने राहत होती. मात्र त्यांनी टोकाचं पाऊल का उचललं, याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. या प्रकरणाचा अधिक तपास अंबाजोगाई शहर पोलीस करत आहेत.


लोको पायलटने संपवलं जीवन...

मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील लोको पायलटने रेल्वे रुग्णालयात गळफास घेत आत्महत्या केली. सुधाकर चुनारकर आत्महत्या केलेल्या लोको पायलटचं नाव असून तो चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. काही दिवसांपूर्वी बाथरूममध्ये पडून जखमी झाल्याने उपचारासाठी त्यांना रेल्वे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होते. मात्र शुक्रवारी उपचारादरम्यान त्यांनी रुग्णालयातील खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच विभागीय रेल्वे व्यवस्थापक रुग्णालयात दाखल झाले. परिस्थितीचा आढावा घेत या घटनेची चौकशी केली जाणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. 

Topics mentioned in this article