Ahilyanagar News : जेव्हा एखाद्या सर्वसामान्य कुटुंबाच्या घरावर दरोडा पडतो किंवा एखाद्याची मौल्यवान वस्तू चोरीला जाते ते तेवढ्यापूरतं सीमित नसतं. यामागे गेल्या कित्येक वर्षांची मेहनत असते. मध्यमवर्गीय कुटुंब जीवाचं रान करून, कधी पोटाला चिमटा काढून एक एक पै जमा करीत आपलं घर उभं करीत असतो. मात्र जेव्हा दरोडा होता तेव्हा एका क्षणात होत्याचं नव्हतं होतं. त्यातही वृद्ध पती-पत्नीवर झालेला आघात कधीही भरून न निघणारा असतो. ह्युमन्स ऑफ बॉम्बे या पेजने अहिल्यानगरमधील एका कुटुंबासोबत घडलेला प्रकार कथन केला. हे वृद्ध दाम्पत्य अहिल्यानगरमध्ये राहतं, तर मुलगा नवी मुंबईत राहतो. मुलाने आपल्या आई-वडिलांसोबत घडलेला धक्कादायक प्रकार सांगितला.
मुलाने सांगितलं आई-वडिलांसोबत काय घडलं?
'शुक्रवारी रात्री २ वाजता मला माझ्या आईचा फोन आला... आणि तिच्या आवाजावरूनच मला समजलं की काहीतरी भयंकर घडलंय. माझे आई-वडील अहिल्यानगरमधील आमच्या गावी एकटेच राहतात, तर आम्ही नवी मुंबईत असतो. वर्षानुवर्षे भाड्याच्या घरात राहून, पोटाला चिमटा काढून त्यांनी एक-एक रुपया साठवला होता. माझ्या आईने रात्री उशिरापर्यंत ब्लाउज शिऊन पैसे जमा केले, तर वडिलांनी शिक्षक म्हणून नोकरी केली – तेव्हा कुठे त्यांनी स्वतःचं हक्काचं घर उभं केलं होतं.'
पण शुक्रवारी रात्री ११:३० वाजता त्या स्वप्नाचं रूपांतर एका भयानक स्वप्नात झालं. दरवाजा तोडल्याच्या आवाजाने आईला जाग आली... आणि ती काही समजायच्या आतच तिच्या गळ्याला सुरा लावला गेला. डोळ्यांवर टॉर्चचा प्रखर प्रकाश टाकला गेला. तिने वडिलांना हाक मारण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी तिला मागे खेचलं. हॉलमध्ये झोपलेल्या माझ्या वडिलांना जेव्हा जाग आली, तेव्हा त्यांच्याही मानेवर सुरा ठेवलेला होता.
तीन माणसं होती. चेहरे झाकलेले आणि हातांत मोजे. त्यांनी वायफायची वायर कापली आणि आम्ही बसवलेली सर्व सुरक्षा यंत्रणा मोडून काढली. जवळपास एक तास माझे आई-वडील एका जागी सुन्न होऊन बसले होते... आणि त्या दरोडेखोरांनी ७५ लाख लुटून नेलं. यामध्ये सोनं आणि आईचं मंगळसूत्रही लुटलं. २३ वर्षांची कमाई काही मिनिटांत गायब झाली. आईला रक्तदाबाचा त्रास आहे, त्या रात्री ती पूर्णपणे गळून गेली होती. ती थरथर कापत होती. ती फक्त पिण्यासाठी पाणी मागत होती. चोर तिथून निघून गेल्यावर आई-वडिलांनी आम्हाला फोन केला आणि आम्ही तातडीने गावाकडे निघालो.
आम्ही FIR नोंदवला आहे आणि अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहोत, जेणेकरून गुन्हेगार पकडले जावेत. पण अजूनपर्यंत कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाही. काही वर्षांपूर्वी, आमची बँक बुडाल्यामुळे वडिलांच्या पेन्शनचे ५० लाख रुपये आधीच बुडाले होते. तेव्हापासून बँकांवरचा विश्वास उडाल्याने त्यांनी आपली २३ वर्षांची पुंजी जवळ ठेवली होती. पण आज तिथेही ते सुरक्षित राहिले नाहीत.
सर्व गमावलं पण, आईने ५०० रुपयांनी नोट हातावर ठेवली...
मी जेव्हा जेव्हा गावाहून निघतो, तेव्हा आई माझ्या हातावर ५०० रुपयांची नोट ठेवते. तो तिचा आशीर्वाद देण्याची एक पद्धत आहे. यावेळीही २३ वर्षांची कमाई गमावलेली असताना आणि स्वतःचं घर उद्ध्वस्त होताना बघूनही, तिने तेच केलं. तिने शांतपणे माझ्या पत्नीच्या हातात ५०० रुपये दिले. मी IT मध्ये काम करतो आणि माझी पत्नी डॉक्टर आहे. आम्ही पैसे पुन्हा कमावू शकतो. पण हे फक्त पैशांबद्दल नाहीये. भारतातील एका सामान्य कुटुंबाने स्वतःचं काहीतरी उभं करण्यासाठी जे कष्ट आणि त्याग केलेला असतो, त्याबद्दल हे आहे. आमची फक्त एवढीच विनंती आहे की अधिकाऱ्यांनी गुन्हेगारांना शोधावं आणि माझ्या आई-वडिलांना न्याय मिळवून द्यावा."
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world