बारामतीतील संघर्षाला मोदी विरुद्ध राहुल रुप देण्याचा फडणवीसांनी प्रयत्न का केला? वाचा प्रमुख कारणे

Lok Sabha Election 2024 : बारामती लोकसभा निवडणूक शरद पवारविरुद्ध अजित पवार किंवा सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी नाही, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधात राहुल गांधी अशी आहे, असे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. पण या विधानामागील नेमकी कारणे काय आहेत?

जाहिरात
Read Time: 4 mins

Lok Sabha Elections 2024: बारामती लोकसभा मतदारसंघात होणारी लढत ही देशातल्या प्रमुख लढतींपैकी एक झाली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. त्यांचा मुकाबला त्यांची नणंद आणि विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी आहे. ही दोन्ही नावे संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेत आणि या दोघींमधील लढतीबाबतही संपूर्ण महाराष्ट्राला कळून चुकले आहे.

असे असताना महाराष्ट्र भाजपने येथील लढत ही मोदी विरूद्ध राहुल गांधी अशी असल्याचे चित्र रंगवण्यास सुरुवात केली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पटांगणात भाजपचा शनिवारी (6 एप्रिल 2024) मेळावा पार पडला. यामध्ये बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीसांनी (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) म्हटले की, "बारामती लोकसभा निवडणूक शरद पवारविरुद्ध अजित पवार किंवा सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधात राहुल गांधी अशी आहे."

(PM Modi : काँग्रेसच्या जाहिरनाम्यावर मुस्लीम लीगची छाप, पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल)

महाविकास आघाडीवर फडणवीसांनी आपल्या भाषणामध्ये टीका केली. त्यांनी म्हटले की, बारामतीचा खासदार नरेंद्र मोदी यांच्या विकास यात्रेमध्ये चालेल की राहुल गांधी यांच्या समाजविरोधी व देशाच्या विकासाचा अजेंडा नेस्तनाबूत झाला पाहिजे, अशा मानसिकतेच्या मागे चालेल; याचा फैसला या निवडणुकीच्या माध्यमातून होणार आहे.  सुनेत्रा पवार विरूद्ध सुप्रिया सुळे ही तशी पाहिली तर घरातली निवडणूक मात्र त्याला राष्ट्रीय रुप देण्याचा फडणवीसांनी प्रयत्न केला आहे. 

अजित पवारांसमोरील आव्हान

सुप्रिया सुळे या तीन वेळा खासदार राहिलेल्या असून त्याच शरद पवारांच्या उत्तराधिकारी असतील, हे आता स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्ह अजित पवारांना मिळाल्यानंतर त्यांच्यासमोर सगळ्यात मोठे आव्हान हे त्यांच्या पत्नीला बारामतीतून निवडून आणण्याचे आहे. या मागच्या कारणांची मीमांसा करताना काही विश्लेषकांनी म्हटले आहे की घरातील या लढाईला मोदी विरूद्ध राहुल गांधी असे रुप दिल्याने स्थानिक पातळीवरील गुंतागुंत काही प्रमाणात सुटण्यास मदत होईल, असा फडणवीसांचा होरा असावा असे विश्लेषकांना वाटते आहे. 

Advertisement

(आघाडीत बिघाडी होणार? पवारांच्या उमदेवार विरोधात काँग्रेसचा उमेदवार?)

शरद पवारांनाही करावा लागतोय संघर्ष 

काहींनी या सगळ्यामागे आणखी एक कारण असावे असे म्हटले आहे. शरद पवार यांना मिळणारी सहानुभूती कमी व्हावी हा या मागचा प्रयत्न असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. शरद पवारांचे वय 82 असून यंदाची निवडणूक ही त्यांच्यासाठी सगळ्यात आव्हानात्मक बनली आहे. पक्षफुटीनंतर आपल्या संघटनेला बळकट करणे, मुलीला विजयी करणे, राज्यात आपल्या पक्षाला अधिकाधिक जागा मिळतील याकडे पाहणे, महाविकास आघाडी महायुतीपेक्षा प्रबळ कशी होईल याकडे पाहणे अशा अनेक पातळ्यांवर त्यांना संघर्ष करावा लागत आहे. यातील मुलीचा विजय हा त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. 

जनता कोणता देणार पाठिंबा?

अजित पवार यांच्यासाठीही ही निवडणूक तितकीच महत्त्वाची आहे जितकी शरद पवारांसाठी. अजित पवारांनी स्वत:च्या बायकोला निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. सुनेत्रा यांचा पराभव झाला तर अजित पवार यांना तो मोठा धक्का असेल. वर्ष 2019च्या लोकसभा निवडणुकीत मावळ मतदारसंघात अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांचा पराभव झाला होता. त्यापाठोपाठ सुनेत्रा पवार यांचाही आता पराभव झाला तर अजित पवार यांच्या नेतृत्व गुणांवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होईल. पक्ष आणि चिन्ह तर मिळाले मात्र लोक शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या पाठीशी उभी आहेत, असा संदेश राज्यभर जाईल आणि विधानसभा निवडणुकीवेळी भाजप अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी झुकवेल, अशी भीतीही वर्तवली जात आहे. 

Advertisement

(कल्याणची जागा कोण लढणार? फडणवीसांनी एका शब्दात विषय संपवला)

शरद पवार बारामतीचा किल्ला राखणार का?

दोन्ही पवारांसाठी ही जागा जितकी महत्त्वाची आहे तितकीच ती भाजपसाठीही आहे. अब की बार 400 पारचा नारा देणाऱ्या भाजपला हे लक्ष्य गाठायचे असेल तर आतापर्यंत जिंकत आलेल्या जागांसह आजवर कधीही न जिंकलेल्या जागा जिंकणे हे त्यांच्यासाठी महत्त्वाचे आहे. 2014 आणि 2019 च्या लाटेतही बारामतीचा किल्ला शरद पवारांना ढासळू दिला नव्हता. हा मतदारसंघ जिंकल्यास शरद पवारांचे अस्तित्व संपवण्यास मदत होईल, असा भाजपचा होरा आहे, त्यामुळे इथे सुनेत्रा पवार जिंकणं हे भाजपसाठीही महत्त्वाचे आहे.

Topics mentioned in this article