जाहिरात

Maharashtra Alcohol Price Hike: चपटीपासून खंब्यापर्यंत सगळं महागणार, दारूप्रेमींना महागाईची किक

महसूल वाढीच्या दृष्टीने सचिवस्तरीय अभ्यासगटाने मद्यनिर्मिती धोरण, अनुज्ञप्ती, उत्पादन शुल्क आणि कर संकलन वाढीसाठी इतर राज्यांतील चांगल्या पद्धतींचा अभ्यास करून शासनाला अहवाल सादर केला होता.

Maharashtra Alcohol Price Hike: चपटीपासून खंब्यापर्यंत सगळं महागणार, दारूप्रेमींना महागाईची किक
मुंबई:

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या (State Excise Department) महसूल वाढीच्या उपाययोजनांना आज मंत्रिमंडळ बैठकीत (Maharashtra Cabinet Meeting) मान्यता देण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या उपाययोजनांमुळे विभागाचा महसूल दरवर्षी सुमारे 14 हजार कोटींनी वाढण्याची अपेक्षा आहे. महसूल वाढीच्या दृष्टीने सचिवस्तरीय अभ्यासगटाने मद्यनिर्मिती धोरण, अनुज्ञप्ती, उत्पादन शुल्क आणि कर संकलन वाढीसाठी इतर राज्यांतील चांगल्या पद्धतींचा अभ्यास करून शासनाला अहवाल सादर केला होता. या अहवालानुसार, उत्पादन शुल्क विभागाच्या सुधारित आकृतीबंधाला आणि एकात्मिक नियंत्रण कक्ष उभारण्यास मान्यता देण्यात आली. या नियंत्रण कक्षाद्वारे कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) प्रणालीच्या माध्यमातून राज्यातील आसवन्या (Distillery), मद्यनिर्माणी (Brewery) आणि घाऊक विक्रेत्यांवर नियंत्रण ठेवले जाणार आहे.

नक्की वाचा : 'टाईम प्लीज' घेतलेला पाऊस पु्न्हा परतणार; येत्या 2-3 दिवसात जोरदार पावसाचा अंदाज

नवीन कार्यालये आणि पदभरतीस मंजुरी

सुधारित आकृतीबंधानुसार, मुंबई शहर आणि उपनगरात एक नवीन विभागीय कार्यालय आणि मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर तसेच अहिल्यानगर या सहा जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी एक वाढीव अधीक्षक कार्यालय सुरू होणार आहे. तसेच, विभागाच्या बळकटीकरणासाठी 744 नवीन पदे आणि 479 पर्यवेक्षीय पदे अशा एकूण 1223 पदांना मान्यता देण्यात आली आहे.

नक्की वाचा : गुगल मॅपमुळे कार हवेत लटकली; प्रवासी थोडक्यात बचावले

उत्पादन शुल्कात वाढ

मंत्रिमंडळाने उत्पादन शुल्काच्या दरात वाढीच्या प्रस्तावांना मान्यता दिली आहे. भारतीय बनावटीचे विदेशी मद्याबाबत (IMFL) बोलायचे झाल्यास रु. 260/- प्रति बल्क लिटरपर्यंतच्या निर्मिती मूल्याच्या मद्यावर उत्पादन शुल्काचा दर निर्मिती मूल्याच्या 3 पटांवरून 4.5 पट करण्यात येणार आहे.  देशी मद्याबाबत बोलायचे झाल्यास याचा दर प्रति प्रूफ लिटर रु. 180/- वरून रु. 205/- इतका दर वाढवण्यात येणार आहे.

महाराष्ट्र मेड लिकर (MML), दारूच्या नव्या प्रकारास मान्यता

महाराष्ट्रात धान्याधारित विदेशी मद्याचा नवीन प्रकार ‘महाराष्ट्र मेड लिकर (MML)' तयार करण्यास मान्यता देण्यात आली आहे. याची निर्मिती फक्त महाराष्ट्रातील मद्य उत्पादक करू शकतील. यासाठी नवीन ब्रँड नोंदणी करणे बंधनकारक असेल.

किंमतीत वाढ

उत्पादन शुल्क आणि एमआरपी सूत्रातील बदलांमुळे 180 मि.लि. बाटलीच्या किमान किरकोळ किंमती खालीलप्रमाणे असतील (कंसात जुने दर):  

देशी मद्य: रु. 80 (रु. 70)  

महाराष्ट्र मेड लिकर (MML): रु. 148 (जुन्या किंमतीची माहिती दिलेली नाही)  

भारतीय बनावटीचे विदेशी मद्य: रु. 205 (रु. 110-115)  

प्रिमियम विदेशी मद्य: रु. 360 (रु. 210)

अनुज्ञप्ती भाडेतत्त्वासाठीच्या शुल्कातही वाढ

यापुढे सीलबंद विदेशी मद्य विक्री अनुज्ञप्ती (एफएल-2) आणि हॉटेल/रेस्टॉरंट अनुज्ञप्ती (एफएल-३) कराराद्वारे भाडेतत्त्वावर चालविता येणार आहे. यासाठी वार्षिक अनुज्ञप्ती शुल्काच्या अनुक्रमे 15% आणि 10 % अतिरिक्त शुल्क आकारले जाईल.

महसुलात 14 हजार कोटींची वाढ होणार

या उपाययोजनांमुळे उत्पादन शुल्क आणि विक्री कराच्या माध्यमातून दरवर्षी 14 हजार कोटींची महसूल वाढ अपेक्षित आहे. या निर्णयामुळे राज्य उत्पादन शुल्क विभाग अधिक कार्यक्षम आणि महसूलवृद्धीला चालना देणारा ठरेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com