संजय तिवारी
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे नवे अध्यक्ष याच महिन्यात जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. येत्या एक-दोन दिवसांत काँग्रेस नेते राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला आणि काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची दिल्लीत बैठक पार पडणार आहे. याच बैठकीमध्ये महाराष्ट्र काँग्रेसचा नवा अध्यक्ष कोण असेल याची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. लोकसभा निवडणूक काँग्रेस, शिवसेना (उबाठा) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांच्या महाहाविकास आघाडीने एकत्र लढली होती. या निवडणुकीत काँग्रेसचे 14 तर महाविकास आघाडीचे एकूण 31 खासदार निवडून आले होते. मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला लोकसभेइतके यश मिळाले नाही, विधानसभा निवडणुकीत काँग्रेसटचे अवघे 16 आमदार निवडून आले आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या घवघवीत यशामुळे महाविकास आघाडीला जबर धक्का बसला. महाविकास आघाडीच्या या निवडणुकीतील पीछेहाटीसाठी बरीच कारणे जबाबदार असल्याचे सांगितले जात असले तरी जागावाटपावरून झालेले वाद हे त्यातले प्रमुख कारण मानले जाते. काँग्रेसने जागावाटपामध्ये ताठर भूमिका घेतल्याचे दिसले होते. ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची रा्ष्ट्रवादी काँग्रेसही अडून बसल्याने वाद तर झालेच शिवाय काही जागांवर काँग्रेसच्याविरोधातच मित्र पक्षांनी उमेदवार उतरवल्याचे दिसले होते. हा आता भूतकाळ झाला असला तरी भूतकाळातील या घटनामुळे प्रदेशाध्यक्षपद बदलाची मागणी सुरू झाली होती, हे विसरता येऊ शकत नाही.
नक्की वाचा :लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी 2100 रुपये कधीपासून मिळणार? विखे-पाटलांनी दिली माहिती
प्रदेशाध्यक्षपद स्वीकारण्यास नेत्यांचा नकार
नाना पटोले हे विद्यमान प्रदेशाध्यक्ष असून त्यांना पुन्हा हे पद देण्यास काँग्रेसमधल्याच अनेकांनी विरोध दर्शवला आहे. त्यांच्यावर तिकिटे विकल्यापासून अनेक आरोप करण्यात आले. त्यामुळे त्यांचे नाव स्पर्धेतून बाद झाल्याचे सांगितले जात होते. बाळासाहेब थोरात हे तुलनेने मवाळ असल्याने त्यांच्याही नावाला विरोध केला जात आहे. सुनील केदार यांची प्रतिमा मलीन असून ते अति आक्रमक असल्याने त्यांच्याही नावाला विरोध दर्शवला जात आहे. सतेज पाटील, पृथ्वीराज चव्हाण,विश्वजीत कदम आणि अमित देशमुख, नितीन राऊत यांचीही नावे या पदासाठी चर्चेत होती, मात्र यातील सगळ्यांनी हे पद स्वीकारण्यास अनुत्सुकता दाखवली आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला विजय वडेट्टीवार यांचे एकमेव नाव आघाडीवर आहे.
नक्की वाचा : शरद पवार- उद्धव ठाकरेंमध्ये दीड तास चर्चा; 'सिल्व्हर ओक'वरील भेटीचं गुपित काय?
नाना पटोलेंचे मन परिवर्तन
नाना पटोले यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर प्रदेशाध्यक्षपदाचा राजानीमा दिला होता. नवा प्रदेशाध्यक्ष निवडला जाईपर्यंत त्यांना हंगामी प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहण्यास सांगण्यात आले आहे. एकेकाळी महाराष्ट्रात सत्तेवर असलेल्या या पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष सापडत नाहीये. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधीही लागू शकतात. अशा परिस्थितीत पूर्णवेळ प्रदेशाध्यक्ष नसणे, नव्या प्रदेशाध्यक्षाला तयारीसाठी किती काळ मिळतो हे पाहणे या सगळ्या गोष्टी राजकीय अभ्यासकांसाठी फारच रंजक बनत चालल्या आहेत. नाना पटोले हे आधी प्रदेशाध्यक्षपद पुन्हा मिळाल्यास स्वीकारण्यास तयार नव्हते, मात्र आता कुणीच तयार होत नसेल आणि कोणाची इच्छा नसेल तर आपण ती जबाबदारी नाना पटोले पुन्हा स्वीकारण्यास तयार असल्याचे सांगण्यात येत आहे.
नक्की वाचा : महायुतीत तणाव!'आमचा राजकीय अस्त झाला तरी चालेल' शिंदेंच्या आमदाराचा थेट इशारा
काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष होण्यास कोणी तयार का होत नाही ?
काँग्रेसकडे बराच काळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद आलेले नाही. विधानसभा निवडणुकीत काँग्रेस ज्या महाविकास आघाडीचा भाग होती, त्या महाविकास आघाडीचा दारूण पराभव झालेला आहे. सत्तेबाहेर राहणे हे काँग्रेसला मानवत नाही. आर्थिक ओघ आटल्याने निवडणुकीसाठी तयारी करायची कशी हा काँग्रेसपुढे मोठा प्रश्न असतो. प्रदेशाध्यक्षपद स्वीकारणाऱ्या व्यक्तीकडे पक्ष संघटनेसोबतच आर्थिक रसद पुरवण्याचीही जबाबदारी देण्यात आलेली असते. निवडणुका नसताना प्रदेशाध्यक्षपद असणे ही बाब वेगळी असते आणि निवडणुका असताना प्रदेशाध्यक्षपद एखाद्या नेत्याकडे असणे ही बाब वेगळी असते. स्थानिक स्वराज्यसंस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना ही आर्थिक रसद कशी जमा करायची हा प्रश्न निर्माण झालेला असल्यानेच बहुतांश काँग्रेस नेत्यांनी हे पद स्वीकारण्यास नकार दिल्याचे सांगितले जाते.
नाना पटोलेंचा राहुल गांधींना SMS
हंगामी प्रदेशाध्यक्ष असलेल्या नाना पटोले आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांची 15 जानेवारी रोजी दिल्लीमध्ये काँग्रेस मुख्यालयाच्या उद्घाटनासाठी आयोजित काँग्रेसच्या कार्यक्रमात भेट झाली होती. या भेटीदरम्यान दोघांमध्ये प्रदेशाध्यक्षपदाबाबत चर्चा झाली होती. कोणालाही करा पण लवकर करा अशी विनंती नाना पटोले यांनी राहुल गांधी यांना केली होती. या भेटीनंतर नाना पटोलेंनी तशाच आशयाचा एक मेसेज राहुल गांधींना पाठवला होता. ज्यावर त्यांचा तत्काळ Yes म्हणून प्रतिसादही आल्याचे सांगितले जाते. त्यामुळे याच महिन्यात काँग्रेसला नवा प्रदेशाध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे.