जुई जाधव, मुंबई: विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याची चर्चा आहे. विधानसभेच्या निकालाला दोन महिने उलटून गेल्यानंतरही एकत्र बैठक न झाल्याने मविआ पुढे टिकणार का? असा सवाल उपस्थित होत होता. दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचा बॉम्ब टाकल्याने मविआत आलबेल नसल्याची चर्चा होती.
अशातच आज राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या निवासस्थानी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये महत्त्वाची बैठक पार पडली. शरद पवार, उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरे, संजय राऊत, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आदी नेते या बैठकीला उपस्थित होते. तब्बल दीड तास चाललेल्या या बैठकीची इनसाईड स्टोरी आता समोर आली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा)
सिल्वर ओकवरील शरद पवार आणि उद्धव ठाकरेंमध्ये झालेल्या बैठकीत महाविकास आघाडीच्या पुढील रणनीती संदर्भात चर्चा झाल्याचं सांगण्यात देत आहे. तसेच 25 जानेवारी रोजी मस्सजोगचे सरपंच संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्या प्रकरणातील दोषींना कडक शिक्षा व्हावी यासाठी मुंबईमध्ये जनआक्रोश मोर्चा निघणार आहे.
या मोर्चामध्ये महाविकास आघाडीची भूमिका नेमकी काय असणार? मोर्चामध्ये कशाप्रकारे सहभागी होणार? याबाबही या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. विधानसभा निवडणुकांपासून महाविकास आघाडीमध्ये समन्वयाचा अभाव दिसत होता. त्या दृष्टिकोनातून पुढील पावले नेमकी काय उचलायची? यासाठी लवकरच महाविकास आघाडीचे राज्यस्तरीय महत्त्वाच्या नेत्यांची बैठक होण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.
(नक्की वाचा- "शिंदेंची गरज संपली, आता नवीन 'उदय' पुढे येईल"; विजय वडेट्टीवार यांचं मोठं वक्तव्य)
दरम्यान, 22 जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भाने सुनावणी होत आहे. ही सुनावणी आता अखेरच्या टप्प्यात असून लवकरच राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होण्याचीही शक्यता आहे. त्यासंबंधीही या बैठकीत चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world