महाराष्ट्र विधानसभेसाठी मतदान पार पडल्यानंतर आता 23 तारखेला लागणाऱ्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्याआधी मतदानानंतर
समोर आलेल्या एक्झिट पोल्सने नेते मंडळींची धाकधुक वाढवली आहे. बुधवारी समोर आलेल्या काही सर्वेंमध्ये महायुतीला तर काही सर्वेंनी मविआला बहुमत दिले होते. अशातच आज एक्सिस माय इंडियाने एक्झिट पोलचे आकडे जाहीर केले आहेत. ज्यामध्ये महायुतीला बहुमत तर मविआची दाणादाण उडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
ॲक्सिस माय इंडियाने आज जाहीर केलेल्या एक्झिट पोलने धक्कादायक अंदाज वर्तवला आहे, ज्यामुळे महाविकास आघाडीची झोप उडण्याची शक्यता आहे.या एक्झिट पोलनुसार महायुतीला 178 ते 200 जागा मिळू शकतात. तर महाविकास आघाडीला 82 ते 102 जागा मिळू शकतात. इतरांना 6 ते 12 जागा मिळू शकतात. या एक्झिट पोलच्या अंदाजाने स्पष्टपणे महायुती सत्तेत येत असून मविआचा दारुण पराभव होणार असल्याचा दावा केला आहे.
नक्की वाचा: संभाजीनगरमध्ये नोट फॉर व्होट! इम्तियाज जलील यांचे खळबळजनक आरोप; थेट VIDEO दाखवले
कोणत्या पक्षाला किती जागा?
यापैकी भाजपला 98 ते 107 जागा, शिवसेना शिंदे गटाला 53 ते 58 जागा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 25 ते 30 जागा मिळू शकतात. महाविकास आघाडीचा घटक असलेल्या काँग्रेसला 28 ते 36 जागा, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला 26 ते 32 जागा आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 26 ते 30 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर मविआचे घटक पक्ष असलेल्या सपा आणि शेकापला दोन ते चार जागा मिळू शकतात, असा अंंदाज वर्तवण्यात आला आहे.
दरम्यान, या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने 149, शिवसेना 81, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट 59,, शिवसेना ठाकरे गट 95,शरद पवार गट 86, वंचित बहुजन आघाडीने 200 उमेदवार रिंगणात उतरवले होते. एक्सिस माय इंडियाच्या या एक्झिट पोलने आता महाविकास आघाडीच्या गोटात मात्र टेन्शन चांगलेच वाढवले आहे.