Corporator Salary And Benefits: महाराष्ट्रातील नगरपरिषद, महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी अखेर थांबली. या निवडणुकांमध्ये तिकीट मिळवण्यासाठी, निवडून येण्यासाठी अभूतपूर्व असा संघर्ष अन् शक्तीप्रदर्शन पाहायला मिळाले. आपल्या वॉर्डाचा नगरसेवक होण्यासाठी या उमेदवारांनी कोट्यवधी रुपये उधळले. आपल्या वॉर्डाचा प्रमुख होण्यासाठी अशी अफाट ताकद लावणाऱ्या या नगरसेवकांना नेमके मानधन किती मिळते? त्यासोबत त्यांना कोणत्या सुविधा मिळतात माहित आहे का? जाणून घ्या याबाबतचीच खास माहिती...
नगरसेवकांना मानधन किती मिळते?| Nagarsevak Salary
लोकशाहीच्या उतरंडीत सामान्य नागरिकासाठी सर्वात जवळचा आणि हक्काचा दुवा म्हणजे 'नगरसेवक'. गावामध्ये जसा प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी सरपंच असतो तसाच शहरात प्रत्येक प्रभागातील समस्या सोडवण्यासाठी नगरसेवक असतो. गल्लीतील कचाऱ्यापासून ते पाण्याचा नळ आणि फुटपाथच्या दुरुस्तीपर्यंत प्रत्येक कामासाठी आपण नगरसेवकाचा उंबरठा झिजवतो. यासाठी त्यांना मानधनही दिले जाते.
तांत्रिकदृष्ट्या नगरसेवकांना 'पगार' मिळत नाही, तर ते सरकारी कर्मचारी नसून लोकप्रतिनिधी असल्याने त्यांना 'मानधन' दिले जाते. महाराष्ट्रातील महानगरपालिकांच्या वर्गवारीनुसार हे मानधन ठरते. मुंबई (BMC), पुणे (PMC), नागपूर आणि ठाणे यांसारख्या 'अ+' आणि 'अ' श्रेणीतील महापालिकांमध्ये नगरसेवकांना दरमहा २५,००० रुपये मानधन दिले जाते. ब आणि क श्रेणीतील महापालिकांमध्ये ही रक्कम १०,००० ते १५,००० रुपयांच्या दरम्यान असते.
बैठक भत्ता, विविध सुविधा..
याशिवाय महापालिकेच्या प्रत्येक सभेला उपस्थित राहण्यासाठी त्यांना वेगळा भत्ता मिळतो. पालिकेच्या सर्वसाधारण किंवा वेगवेगळ्या समितींच्या सभेला उपस्थित राहण्यासाठी त्यांना ४०० ते ५०० रुपये स्वतंत्र 'बैठक भत्ता' मिळतो. त्याचबरोबर नगरसेवकांना मोफत प्रवास (मुंबईत 'बेस्ट' बस), टेलिफोन भत्ता आणि कुटुंबासाठी वैद्यकीय विमा यांसारख्या सोयी-सुविधाही मिळतात. २०१७ पूर्वी हे मानधन केवळ १०,००० रुपये होते, जे आता वाढवून २५,००० करण्यात आले आहे.
परंतु, केवळ मानधनावरून नगरसेवकाच्या आर्थिक ताकदीचा अंदाज बांधणे चुकीचे ठरेल. खऱ्या अर्थाने ताकद असते ती 'नगरसेवक स्वेच्छा निधी'मध्ये. प्रत्येक नगरसेवकाला आपल्या प्रभागातील रस्ते, गटारे, पथदिवे आणि सार्वजनिक उद्यानांच्या कामासाठी वर्षाला सुमारे १ ते १.५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जातो. मुंबईसारख्या श्रीमंत महापालिकेत ही तरतूद कधीकधी त्याहून अधिक असू शकते. या व्यतिरिक्त स्थायी समितीच्या माध्यमातून विशेष प्रकल्पांसाठी अतिरिक्त कोट्यवधींचा निधी मिळवण्याची मुभाही असते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world