जाहिरात

Congress News: लढण्याआधीच शस्त्र टाकली! 2 महिन्यात तीनदा मानली हार; ठाकरेंच्या चक्रव्यूहात 'हात' कसा अडकला?

Vidhan Parishad Election 2026: गेल्या 2 महिन्यात तब्बल तीन वेळा काँग्रेसने माघार घेतली. त्यामुळे  राजकीय वर्तुळात आता एकच चर्चा रंगली आहे.

Congress News: लढण्याआधीच शस्त्र टाकली!  2 महिन्यात तीनदा मानली हार; ठाकरेंच्या चक्रव्यूहात 'हात' कसा अडकला?
Vidhan Parishad Election 2026: लढण्याआधीच माघार घेणाऱ्या सेनापतींमुळे काँग्रेसच्या भविष्यावर आता प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
मुंबई:

योगेश पाटील, प्रतिनिधी

Vidhan Parishad Election 2026: महाविकास आघाडीमध्ये सध्या बिघाडीचे वारे वाहत असून, त्यात सर्वात मोठा फटका काँग्रेसला बसला आहे. ज्या पक्षाने देशात पुन्हा सत्तेत येण्याचे स्वप्न पाहिले आहे, त्या काँग्रेसला महाराष्ट्रात मात्र मित्रपक्षांसमोर वारंवार नमते घ्यावे लागत आहे. गेल्या 2 महिन्यात तब्बल तीन वेळा काँग्रेसने माघार घेतली. त्यामुळे  राजकीय वर्तुळात आता एकच चर्चा रंगली आहे.

दोन महिन्यात तीनदा माघार

राज्यातील राजकारणात काँग्रेस सध्या बॅकफूटवर गेल्याचे चित्र आहे. महाविकास आघाडीत सामील झाल्यापासून काँग्रेसची जागा फक्त माघार घेण्यासाठीच उरली आहे का, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. याची सुरुवात 5 मार्च रोजी झाली, जेव्हा शरद पवारांना पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसने राज्यसभेच्या रिंगणातून आपली पावले मागे घेतली. 

त्यानंतर 9 एप्रिलला बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवारांविरोधात अर्ज दाखल केलेल्या आपल्या उमेदवाराला पक्षाने माघार घ्यायला लावली. आता विधान परिषदेच्या निवडणुकीतही अंबादास दानवे यांच्यासाठी काँग्रेसने शेवटच्या क्षणी माघार घेत हॅट्ट्रिक पूर्ण केली आहे.

( नक्की वाचा : Sanjay Raut: ठाकरेंचा राऊतांना 'चेक मेट'! आदित्य ठाकरेंनी निर्णय फिरवला आणि संजय राऊतांचा पत्ता कट झाला? )

ठाकरेंची रणनीती आणि काँग्रेसची कोंडी

विधान परिषदेची ही निवडणूक उद्धव ठाकरे स्वतः लढणार अशा भ्रमात काँग्रेसचे नेते होते. मात्र, अर्ज दाखल करण्याच्या अवघ्या 24 तास आधी ठाकरेंनी अंबादास दानवे यांचे नाव जाहीर करून काँग्रेसला मोठा धक्का दिला. यामुळे काँग्रेसकडे पर्यायी उमेदवार शोधण्यासाठी वेळच उरला नाही. 

सुरुवातीला काँग्रेसने आपला उमेदवार देण्याची घोषणा करून निवडणुकीत ट्विस्ट निर्माण केला होता, पण ठाकरेंनी फोनाफोनी करून काँग्रेस नेत्यांची समजूत काढली. उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेत्यांमध्ये अडीच तास चाललेल्या या नाट्यानंतर अखेर काँग्रेसने पुन्हा एकदा गुडघे टेकले.

Latest and Breaking News on NDTV

फोनवर फोन आणि अटींची चर्चा

या अडीच तासांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी काँग्रेस नेत्यांना फोनवर फोन केले. उद्धव ठाकरे आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यात 4 वेळा, तर रमेश चैन्निथला यांच्याशी 3 वेळा फोनवर चर्चा झाली. एवढेच नाही तर थेट दिल्लीतील नेते के सी वेणुगोपाल यांनाही ठाकरेंनी 2 वेळा फोन करून परिस्थिती हाताळली.

या सर्व चर्चेनंतर काँग्रेसने अंबादास दानवेंना पाठिंबा तर दिला, पण तो काही अटी-शर्थींवर आधारित असल्याची माहिती समोर आली आहे. आगामी राज्यसभा आणि विधान परिषदेची जागा काँग्रेसला सोडायची, या अश्वासनानंतरच काँग्रेस शांत झाली आहे.

Latest and Breaking News on NDTV

शरद पवारांच्या राष्ट्रवादीची भूमिका

या सर्व राजकीय नाट्यामध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस मात्र नामानिराळी राहिल्याचे दिसून आले. अडीच तास ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसमध्ये वादावादी आणि समजुतीचा खेळ सुरू असताना पवारांचे नेते कुठेही दिसले नाहीत. अगदी शेवटच्या क्षणी पत्रकार परिषदेच्या वेळेला सुप्रिया सुळे काँग्रेस कार्यालयात पोहोचल्या. यामुळे महाविकास आघाडीत काँग्रेसची नेमकी अवस्था काय आहे आणि त्यांना दुय्यम वागणूक दिली जात आहे का, असा प्रश्न आता सर्वसामान्य कार्यकर्त्यांना पडला आहे. लढण्याआधीच माघार घेणाऱ्या सेनापतींमुळे काँग्रेसच्या भविष्यावर आता प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com