Maharashtra Rain Alert: बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आणि मान्सून ट्रफच्या प्रभावामुळे देशातील हवामानात मोठा बदल झाला आहे. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची चिन्हे आहेत. हवामान विभागाने पुढील चार दिवस म्हणजेच 30 जुलैपर्यंत राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. या पार्श्वभूमीवर, प्रशासनाने नागरिक, शेतकरी आणि विशेषतः पर्यटकांसाठी सतर्कतेचा इशारा जारी केला आहे.
वारे अन् विजांचा कडकडाट; 'या' जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, विदर्भ आणि मराठवाड्यात आजपासून 30 जुलैदरम्यान ताशी 40 ते 50 किमी आणि कमाल 60 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. पूर्व-पश्चिम 'शीयर जोंन'मुळे विदर्भातील प्रमुख कृषी क्षेत्राला मुसळधार पावसाचा तडाखा बसू शकतो.
29 जुलै: विदर्भातील गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी 'ऑरेंज अलर्ट' जारी करण्यात आला आहे.
30 जुलै: चंद्रपूर जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता कायम असल्याने इथे 'ऑरेंज अलर्ट' लागू राहणार आहे.
या भागात जोरदार पावसासोबतच विजांचा कडकडाट होणार असल्याने नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे, झाडांखाली उभे राहू नये, असा सक्त सल्ला देण्यात आला आहे.
(नक्की वाचा- IAS Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईला न्यायालयाचा झटका! 8 दूध डेअरींना दिलासा)
कोकण आणि घाटमाथ्यावर 'येलो अलर्ट'
28 ते 31 जुलै या कालावधीत कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथा परिसरासाठी 'येलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे. यात प्रामुख्याने कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर घाटमाथा या जिल्ह्यांचा समावेश आहे.
सलग कोसळणाऱ्या पावसामुळे डोंगर उतारांवर दरड कोसळणे, नद्या-नाले दुथडी भरून वाहणे आणि सखल भागात पाणी साचण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे मुंबई-पुणे एक्सप्रेस वे, आंबोली घाट, ताम्हिणी घाट यांसारख्या घाट रस्त्यांवर प्रवास करणाऱ्यांनी विशेष दक्षता घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
(नक्की वाचा- Malshej Ghat: माळशेज घाटात रस्ता खचल्याने वाहतूक पूर्णपणे बंद! काय आहेत पर्यायी मार्ग?)
प्रशासनाकडून आवश्यक ती खबरदारी
स्थानिक प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवले असून आपत्कालीन यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. पुणे हवामान वेधशाळेने नागरिकांना हवामान विभागाच्या अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world