Sharad Pawar NCP Merger News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एक अभूतपूर्व संकट निर्माण झाले आहे. या घटनेने केवळ सत्तेची समीकरणेच बदलली नाहीत, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अस्तित्वावर पाच मोठे प्रश्न उभे केले आहेत. शरद पवार आता कोणता मोठा निर्णय घेणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
या संपूर्ण प्रकरणात राज्याच्या विशेषत: शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसबाबत निर्माण झाले आहेत ते पाहूया
1. राज्याचा नवीन अर्थ मंत्री कोण होणार?
अजित पवार यांच्याकडे राज्याचे अर्थ आणि नियोजन खाते होते. 23 फेब्रुवारीपासून महाराष्ट्र विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. इतक्या महत्त्वाच्या वेळी वित्त मंत्र्यांचे पद रिक्त झाल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे. जर नवीन अर्थमंत्र्यांची नियुक्ती त्वरित झाली नाही, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः अर्थसंकल्प मांडू शकतात.
मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातून जयंत पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे, कारण त्यांच्याकडे अर्थ खात्याचा जुना अनुभव आहे आणि दोन्ही गट एकत्र आल्यास त्यांच्याकडे ही जबाबदारी सोपवली जाऊ शकते.
( नक्की वाचा : बंडाच्या 3 महिन्यानंतर अजित पवारांनी साहेबांना 'हा' निरोप धाडला होता; सर्वात जवळच्या मित्राचा मोठा खुलासा )
2. पार्थ पवार यांचे राजकीय भविष्य काय?
अजित पवार यांच्यानंतर त्यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या राजकीय पुनर्वसनाची चर्चा सुरू झाली आहे. सुनेत्रा पवार या सध्या राज्यसभा सदस्य आहेत. त्या उपमुख्यमंत्री होणार हे नक्की झालं आहे. तर त्यांच्या रिक्त होणाऱ्या राज्यसभेच्या जागेवर पार्थ पवार यांना संधी दिली जाऊ शकते.
याशिवाय, जुलै महिन्यात होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार गट) आणखी एक जागा मिळणार आहे. त्यामुळे पवार कुटुंबातील पुढच्या पिढीचे नेतृत्व पार्थ पवार यांच्याकडे सोपवून त्यांना दिल्लीत पाठवले जाणार का, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे.
3. प्रफुल्ल पटेल यांची राजकीय भूमिका काय?
अजित पवार यांच्या निधनानंतर प्रफुल्ल पटेल यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी आली आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून पक्षाची धुरा सांभाळणार की शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही गट एकत्र आणण्यासाठी पुढाकार घेणार, यावर राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.
2019 मध्ये शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांना कार्यकारी अध्यक्ष केले होते, त्यामुळे आता पुन्हा एकदा पटेल यांच्याकडे पक्षाची महत्त्वाची सूत्रे जाण्याची दाट शक्यता आहे.
( नक्की वाचा : Sunetra Pawar : पडद्यामागची ताकद आता पहिल्या महिला उपमुख्यमंत्री; वाचा कसा आहे सुनेत्रा पवारांचा प्रवास )
4. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार का?
अजित पवार यांच्या पश्चात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चांना वेग आला आहे. असे म्हटले जात आहे की, जिल्हा परिषद निवडणुकांनंतर 8 फेब्रुवारीला दोन्ही गट एकत्र येण्याचे आधीच ठरले होते.
नवाब मलिक यांच्यासह अनेक नेत्यांनी आता हीच वेळ असल्याचे मत व्यक्त केले आहे. कार्यकर्त्यांकडूनही एकच राष्ट्रवादी अशी मागणी होत असल्याने, शरद पवार आणि सुप्रिया सुले या विलीनीकरणाला संमती देतात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
5. शरद पवार एनडीएच्या सोबत जाणार का?
विलीनीकरण झालेच तर शरद पवार यांची पुढील राजकीय वाटचाल सर्वात महत्त्वाची ठरेल. जर दोन्ही गट एकत्र आले आणि सत्ता कायम राहिली, तर शरद पवार एनडीए (NDA) चा भाग होणार का, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
शरद पवार यांनी नेहमीच भाजपच्या विरोधात भूमिका घेतली आहे, पण बदललेल्या परिस्थितीत ते आपल्या कार्यकर्त्यांसाठी आणि पक्षाच्या भवितव्यासाठी सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेणार की विरोधी पक्षातच राहणार, हा मोठा पेच आहे.