जाहिरात

बंडाच्या 3 महिन्यानंतर अजित पवारांनी साहेबांना 'हा' निरोप धाडला होता; सर्वात जवळच्या मित्राचा मोठा खुलासा

Vitthal Maniyar Exclusive Interview :  अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार का? अजित पवारांची तशी इच्छा होती का? हे प्रश्न चर्चेत आहेत. याबाबत पवार कुटुंबीयांचे जवळचे मित्र विठ्ठल मणियार यांनी मोठा खुलासा केला आहे.

बंडाच्या 3 महिन्यानंतर अजित पवारांनी साहेबांना 'हा' निरोप धाडला होता;  सर्वात जवळच्या मित्राचा मोठा खुलासा
मुंबई:

अविनाश पवार, प्रतिनिधी

Vitthal Maniyar Exclusive Interview :  अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार का? अजित पवारांची तशी इच्छा होती का? हे प्रश्न चर्चेत आहेत. याबाबत पवार कुटुंबीयांचे जवळचे मित्र विठ्ठल मणियार यांनी मोठा खुलासा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये  फूट पडल्यानंतर काही महिन्यांतच अजित पवार यांनी स्वतः मणियार यांची भेट घेतली होती आणि पुन्हा एकत्र येण्यासाठी शरद पवारांन विनंती केली होती, अशी माहिती मणियार यांनी 'NDTV मराठी' ला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये दिली आहे. 

काय म्हणाले मणियार?

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर साधारण 2 ते 3 महिन्यांनी अजित पवार हे विठ्ठल मणियार यांच्याकडे आले होते. यावेळी त्यांनी आपली भावना व्यक्त करताना म्हटले होते की, काका आपण सर्वांनी एकत्र राहणे मला गरजेचे वाटते. साहेबांनी माझ्यासोबत आणि पक्षासोबत यावे, त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे. तुम्ही त्यांचे जवळचे मित्र आहात, त्यामुळे तुम्ही हा निरोप साहेबांना द्यावा, अशी विनंती अजित पवार यांनी केली होती. अजित पवारांनी सुचवले होते की मणियार आणि अंकुश काकडे या दोघांनी मिळून साहेबांशी (शरद पवार) यावर चर्चा करावी. मणियार यांनी हा निरोप शरद पवार यांच्यापर्यंत पोहोचवला, तेव्हा त्यांनी तो शांतपणे ऐकून घेतलं होतं, असं मणियार यांनी सांगितलं.

महापालिका निवडणुकीच्या काळात दोन्ही गट एकत्र येतील अशी चर्चा रंगली होती आणि जयंत पाटील यांनीही तसे संकेत दिले होते, पण नियतीला काही वेगळेच मान्य होते आणि ती चर्चा पुढे सरकू शकली नाही, असं मणियार यांनी यावेळी बोलताना सांगितलं. 

( नक्की वाचा : Sunetra Pawar : पडद्यामागची ताकद आता पहिल्या महिला उपमुख्यमंत्री; वाचा कसा आहे सुनेत्रा पवारांचा प्रवास )

शरद पवारांनी स्वतःला कसे सावरले

अजित पवारांचं विमान अपघातामध्ये झालेलं धक्कादायक निधन हा शरद पवारांसह सर्वांनाच मोठा धक्का होता.  घरातील कुटुंबप्रमुख म्हणून शरद पवारांना याचे प्रचंड दुःख झाले. ते आतून पूर्णपणे कोलमडले होते, मात्र त्यांनी आपल्या चेहऱ्यावर कधीही तसे भाव दाखवले नाहीत.

काही तासांनंतर त्यांनी स्वतःला सावरले. जे घडून गेले आहे ते बदलता येणार नाही आणि अजित पवारांनाही आता परत आणता येणार नाही, हे त्यांनी स्वीकारले. कुटुंबाला या धक्क्यातून बाहेर काढणे ही त्यांची पहिली प्राथमिकता होती. मी जर ढासळलो तर अजित पवारांची मुले आणि पत्नी यांचे काय होईल, असा विचार करून साहेबांनी स्वतःचे दुःख गिळले. 

कोण आहेत विठ्ठल मणियार?


विठ्ठल मणियार हे केवळ शरद पवारांचे मित्र नसून ते पवार कुटुंबाचा एक भाग मानले जातात. 60 वर्षांहून अधिक काळ राजकारणाच्या केंद्रस्थानी वावरत असूनही त्यांनी कधीही निवडणूक लढवली नाही किंवा कोणतेही सरकारी पद स्वीकारले नाही. ते बारामतीतील विद्या प्रतिष्ठानचे ट्रस्टी आहेत. कठीण काळात ते नेहमीच पवार कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत. 

पाहा संपूर्ण व्हिडिओ

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com