सध्या कोकण, मध्य आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. जोरदार पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे. सातारा जिल्ह्यात नदी, ओढे तुडुंब भरून वाहत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रायगड आणि सातारा या दोन्ही जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. सिंधुदुर्ग, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये पुढील 24 तासांमध्ये अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. याशिवाय पुणे, रत्नागिरी, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट असून मुंबईला यलो अलर्ट देण्यात आला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सध्या मुंबईत मुसळधार पावसासाठीचं सकारात्मक चित्र आहे. पुढील 3 ते 4 तासात मुंबईत ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. 25 आणि 26 मे रोजी केरळच्या काही ठिकाणी मुसळधार पाऊस, गडगडाटी वादळ, विजांचा कडकडाट आणि 40-50 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. येथे वादळी वाऱ्यांसह हलका/मध्यम पाऊस, काही ठिकाणी मुसळधार आणि अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 25-27 मे दरम्यान कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्रात 40-50 किमी प्रतितास वेगाने वादळी वारे वाहण्याचा अंदाज आहे. याशिवाय विजांचा कडकडाट आणि वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता आहे.
नक्की वाचा - Maharashtra Rain : शेतकऱ्यांनो जरा थांबा, पेरणीची घाई करू नका; कृषी विभागानं असं का म्हटलंय?
पावसाचा कहर...
पुणे जिल्ह्यात २४ मे २०२५ रोजी एकूण २२.५ मि.मी. इतका पाऊस झाला. बारामती तालुक्यात सरासरी ८३.६ मि.मी. पावसाची नोंद झाली. या तालुक्यात बारामती मंडळात ७७ मि.मी., माळेगाव मंडळात ८२.८ मि.मी., पणदरे मंडळात सर्वाधिक १०४.८ मि.मी., वडगाव निंबाळकर मंडळात ९६.३ मि.मी., लोणी भापकर मंडळात ८६ मि.मी., सुपा मंडळात ७६ मि.मी., मोरगाव मंडळात ७५.५ मि.मी., उंडवडी मंडळात ८५.३ मि.मी. आणि शिरसुफळ मंडळात ७४.३ मि.मी. पाऊस पडला. पणदरे मंडळात अतिवृष्टी झाली आहे.
इंदापूर तालुक्यात सरासरी ३५.७ मि.मी. पावसाची नोंद झाली. या तालुक्यात भिगवण मंडळात सर्वाधिक ६३.३ मि.मी., इंदापूर मंडळात २३.५ मि.मी., लोणी भापकर मंडळात ४८.३ मि.मी., बावडा मंडळात २३ मि.मी., काटेवाडी मंडळात २६.५ मि.मी., निमगाव केतकी मंडळात १८ मि.मी., अंथुर्णे मंडळात ४४ मि.मी., सणसर मंडळात पाऊस नोंदवला गेला नाही, पळसदेव मंडळात ४८.३ मि.मी. आणि लाखेवाडी मंडळात २६.५ मि.मी. पाऊस पडला.
पुढच्या 36 तासात कोल्हापूरला मुसळधार पावसाचा इशारा
कोल्हापूर जिल्ह्यात रात्रीपासून पावसाची संतातधार आहे. पुढचे पाच दिवस जिल्ह्यात पावसाचं प्रमाण जास्त असण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहेम 29 मे पर्यंत कोल्हापुरात यलो अलर्ट आणि घाट क्षेत्रात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मान्सून गोव्याच्या वेशीवर दाखल झाला आहे. त्यामुळे येत्या ३६ तासांत कोल्हापूर शहर व घाट परिसरातील अनेक भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशाराही देण्यात आला आहे.
कुरबावी गावातील 80 लोकांचे स्थलांतर
नीरा नदीच्या वाढत्या प्रवाहामुळे माळशिरस तालुक्यातील कुरबावी गावात पाणी शिरले आहे. या गावात एनडी आर एफची दोन पथके दाखल झाले आहेत. पहाटेपासूनच गावातील 80 लोकांचे स्थलांतर करण्याची सुरुवात केली आहे. नीरा नदीमध्ये 30000 राहून अधिकचा प्रवाह येत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय. अशातच आता कुरबावी हे गाव पुराच्या विळख्यात सापडलेले दिसून येत आहे.