
महाराष्ट्रात मान्सून 12 दिवस आधीच दाखल झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. दरम्यान 27 मेपासून मान्सूनच्या प्रवासाची गती कमी होणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 27 मेपासून हवामान हळूहळू कोरडं होईल, आणि पुढील काही दिवसात तापमानही वाढेल. त्यामुळे 5 जूनपर्यंत राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही मान्सून दाखल होईलच हे निश्चित नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असं आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
यंदा मान्सूनचा प्रवास जलद गतीने सुरू आहे. त्यामुळे 10 ते 12 दिवसांपूर्वीच मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे. मात्र 27 मेपासून राज्यातील हवामानात अनेक बदल होऊ शकतील, असं सांगितलं जात आहे. मे महिन्याच्या शेवटपर्यंत कोकण वगळता बहुतांश भागात प्रामुख्याने कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे, आणि किमान 5 जूनपर्यंत ही स्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सजग राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी (प्रामुख्याने कोरडवाहू) पेरणी आणि लागवडीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे. हवामान कोरडे होणार असल्यामुळे जर पेरणीची घाई केली तर शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नक्की वाचा - Maharashtra Rain : पावसामुळे दाणादाण, नीरा डावा कालवा फुटला, बारामतीतील 3 इमारती खचल्या
रत्नागिरीत ऑरेंज अलर्ट..
राज्यात मान्सून दाखल झाला आहे, या मान्सूनचा जोर जिल्ह्यात दिसून येतोय.. जिल्ह्यात रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे. आज सकाळपासून देखील पावसाची बरसात सुरूच आहे.. जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून, काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळेल अशी शक्यता वर्तविण्यात आलेली आहे.. मुसळधार पावसामुळे गुहागर तालुक्यातील धोपावेमधील गणेशनगरमध्ये ग्रामस्थांच्या घरात रात्री पाणी शिरलं, तसेच चिपळूण तालुक्यातील खडपोली येथे नदीपात्रात अडकलेल्या तिघांनाही रात्री उशिरा सुखरूप बाहेर काढण्यात आलं.. तसेच गेल्या काही दिवसांत काही ठिकाणी झाडं देखील उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या आहेत, त्यामुळे महावितरणलाही याचा फटका बसला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world