Vidarbha Rain : राज्यातील अनेक भागात गेल्या काही दिवसांपासून पावसानं उघडीप दिली आहे. उन्हाचा चटका वाढल्यानं पुन्हा पाऊस कधी पडणार असा प्रश्न बहुतेकांना पडला आहे. विदर्भातील पावसाबाबत हवामान खात्यानं महत्त्वाची बातमी दिली आहे. पुढील 4-5 दिवसांत विदर्भ प्रदेशात पावसाची तीव्रता वाढणार असल्याची शक्यता हवामान खात्यानं दिला आहे.
कोणत्या जिल्ह्यात पडणार पाऊस?
13 ते 15 ऑगस्ट 2025 दरम्यान, काही ठिकाणी गडगडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट आणि 40-50 किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यांची शक्यता आहे.
13 ऑगस्ट रोजी तीन जिल्ह्यांत अती मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आला आहे. चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून तिथे काही ठिकाणी मुसळधार ते अती मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. विजांचा कडकडाट आणि 40 ते 50 किमी प्रति तास वेगाने वाहणाऱ्या झंझावाती पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे.
( नक्की वाचा : Parbhani News : भूकंप, ज्वालामुखी की आणखी काही, परभणीतल्या शेतातून वाफ येण्याचं कारण समजलं! )
13 ऑगस्ट रोजी भंडारा जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस, गडगडाटासह विजेचा कडकडाट आणि 40-50 किमी वेगाने वाहणाऱ्या झंझावाती वाऱ्यांची शक्यता आहे. त्याच दिवशी अकोला, अमरावती, बुलढाणा, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि वाशीम जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस, गडगडाटासह विजांचा कडकडाट आणि 30-40 किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या झंझावाती वाऱ्यांची शक्यता आहे.
14 ऑगस्ट रोजी चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस, गडगडाटासह विजांचा कडकडाट आणि 40-50 किमी प्रति तास वेगाने वाहणाऱ्या झंझावाती वाऱ्यांची शक्यता आहे.