मविआकडून मुख्यमंत्रिपदाचे 3 चेहरे कोणते? संजय राऊतांनी NDTV मराठीच्या जाहीरनाम्यात सांगितली 'ती' नावं!

जाहिरात
Read Time: 6 mins
मुंबई:

NDTV मराठी महाराष्ट्राचा जाहीरनामा (NDTV Conclave Marathi) कार्यक्रमात NDTV मराठीच्या प्रतिनिधी कविता राणे यांनी संजय राऊत यांना बोलतं केलं. यावेळी संजय राऊतांनी त्यांच्या मनात असलेला महाराष्ट्राचा जाहीरनामा सांगितला. शिवसेना ठाकरे या पक्षाच्यावतीने संजय राऊतांनी सांगितलेले महाराष्ट्राच्या जाहीरानाम्यातील महत्त्वाचे मुद्दे...

जाहीरनामा हा विषय देशभर किंवा जगभरातील मतदार गांभीर्याने घेत नाही. गुळगुळीत कागदावर आपण जाहीरनामा छापतो. लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. त्यातील किती आश्वासनं प्रत्यक्षात पूर्ण होतात ते आपल्याला माहीत आहेत. जाहीरनाम्यात महाराष्ट्रातील अन्न, वस्त्र, निवारा हे विषय येतात. आमच्यासमोरचा मोठा प्रश्न हा राज्य कर्जाच्या ओझ्याखाली बुडालंय तो बाहेर काढलं हा आहे. राज्याला आर्थिक शिस्त लावणं, राज्यात भ्रष्टाचाराचा पूर आलाय त्याला बांध घालणं, राज्याला स्थैर आणणे अशी मोठी आव्हानं आहेत. महाराष्ट्राला औद्योगिक राज्य ओळखलं जातं होतं, पण आता महाराष्ट्राचं पहिल्या दहामध्येही नाव नाही. याशिवाय राज्याला रोजगार मिळत नाही. रोजगार राज्याबाहेर गेलाय. या सर्व गोष्टी थांबवणं हे मोठं आव्हान आहे. 

कायदा सुरक्षेचा मोठा प्रश्न..
राज्यातील लोकप्रतिनिधींच्या सुरक्षा व्यवस्था हा मोठा प्रश्न आहे. लोकप्रतिनिधींच्या दिवसाढवळ्या हत्या होत आहेत. तुरुंगात बसलेले गुन्हेगार राज्याच्या कायदा सुव्यवस्थेला आव्हान देत आहेत. हे राज्यानं कधीच पाहिलं नव्हतं. सरकार योजनेच्या घोषणा करतायेत. पण तिजोरी खाली आहे. महाविकास आघाडीच्या तीन पक्षांनी एकत्र येऊन वचननामा तयार केलाय. 4 तारखेला आम्ही आमचा जाहीरनामा प्रदर्शित करू. आम्ही एकत्र जाहीरनामा प्रसिद्ध करू. आम्ही एकत्रच आहोत आणि जाहीरनामा एकत्रच असायला पाहिजे. 

योजनांसाठी निधी कुठंय?
राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजनांसारख्या अनेक योजनांच्या घोषणा केल्या जात आहेत. त्याबाबत संजय राऊत म्हणाले,  अडीच वर्ष हे सरकार काय करत होतं? कॅबिनेटमध्ये अडीचशे निर्णय घेतले जातात. प्रत्येक जातीनुसार महामंडळं तयार केली जात आहेत. पण निधी कुठून आणणार? हे निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून घोषणा करण्यात आल्या. अगदी लाडकी बहीण योजनासुद्धा. यापूर्वी नरेंद्र मोदी म्हणाले होते, अशा घोषणा करणं आर्थिक बेशिस्तपणा. मात्र झारखंडमध्ये लाडकी बहीण योजनेच्या धर्तीवर सुरू केलेल्या योजनांवर टीका करण्यात आली. राजस्थानमध्ये अशा प्रकारच्या योजनांवर मोदींनी टीका केली. बहिणींची काळजी असेल तर त्यांच्यासाठी रोजगार सुरू करावा. बचत गटाच्या योजनेतून मदत करावी. दीड हजारात कुटुंब चालू शतत नाही. महिलांना सक्षम करून त्यांना उत्पन्न मिळावं म्हणून योजना तयार कराव्यात. मात्र नरेंद्र मोदीं सत्तेत रेवड्या वाटण्याचं काम सुरू आहे. 

नक्की वाचा - NDTV Maharashtracha Jahirnama : 'न्याय देवतेच्या डोळ्यावरील पट्टी काढून काही होत नाही', संजय राऊतांचं रोखठोक वक्तव्य

गेल्या अडीच वर्षात शिवसेना फुटीपासून ते लोकसभा निवडणुकीपर्यंतच्या शिवसेनेच्या स्थित्यंतराबाबत राऊतांना प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले, शिवसेना कायम आव्हानातून उभी राहिली आहे. राजकारणात सोपं काहीच नसतं. शिवसेनच्या जन्मापासून आम्ही आगीशी खेळत राहिलो. बाळासाहेबांसमोर नेहमी आव्हानं होती.. त्यांच्या हयातीत लोकं सोडून गेली. उद्धव ठाकरे यांच्या हातात पक्षाची सूत्र आहेत. त्यांनाही या संघर्षातून जावं लागतंय. फिनिक्स पक्षाप्रमाणे आम्ही राखेतून झेप घेतोय. आमचं चिन्ह घेऊन गेले. तरीही आम्ही मविआच्या माध्यमातून लोकसभेत मोदींचा पराभव केला. विधानसभेत पुनरावृत्ती घडवून दाखवू. नेते गेले पण लोक आमच्यासोबत कायम राहिले.

न्यायालयातील कामकाज पाहिलं तर सरन्यायाधीश पदावरील व्यक्तीने घटनेचं संरक्षण करायला हवं होतं. पण त्यांनी आपलं कर्तव्य पार पाडलं नाही. निवडणूक आयोगाने मोदी आणि शहांच्या दबावाने पक्षपातीपणे भूमिका घेतली. निवडणूक आयोगाचे तीन प्रमूखांनी राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख शरद पवार असताना राष्ट्रवादी पक्ष तुमचा नाही असं सांगितलं. ही कोणती घटना? 

महाविकास आघाडीने निवडणुका जिंकली तर मुख्यमंत्रिपदाचे तीन चेहरे कोणते असतील असा सवाल संजय राऊतांनी विचारण्यात आला. यावेळी राऊत म्हणाले, उद्धव ठाकरे...उद्धव ठाकरे...उद्धव ठाकरे...!

भाजप की राष्ट्रवादीसोबतच जागावाटप सोपं? 
भाजपसोबत असताना आम्ही दोन पक्ष होतो. भाजप महाराष्ट्रात कमजोर होता. त्यांना राज्यात स्थान नव्हतं. पण त्यांनी आमच्या जागा खेचायला सुरुवात केली. मात्र आता परिस्थिती वेगळी आहे. मविआतील तिन्ही पक्ष मजबूत आहेत. तीन पक्षात 288 जागांचं वाटप करणं सोपं नाही. तरीही आम्ही चांगल्या पद्धतीने चर्चा केली. शिवसेना आणि भाजप असताना शेवटच्या मिनिटापर्यंत काही जागांवर वाद होता. आताही चार पाच जागांवर वाद आहे. काँग्रेस पक्षासोबत होणाऱ्या वादाबाबत ते म्हणाले, मी वाईट काहीच बोललो नाही. विजय वडेट्टीवर विद्वान आहेत. ते मुळचे शिवसैनिक आहेत. विद्वान असल्याशिवाय त्यांना काँग्रेसने विरोधी पक्ष नेतेपदी बसवलं का? त्याशिवाय  नाना पटोले माझे अत्यंत जवळचे मित्र. ते त्यांच्या पक्षाची भूमिका मांडतात आणि मी माझ्या पक्षाची मांडतो. 

लोकसभेत आमच्यासमोर जास्त आव्हानं आहेत. चिन्ह नवं होतं. ते लोकांपर्यंत पोहोचवायचं होतं. कठीण परिस्थितीत निवडणुका लढतो. तरी आम्ही ९ जागा जिंकलो. ठाण्यात आम्हाला साडे पाच लाख मतं पडली. कल्याण-डोंबिवलीत मागच्या वेळेपेक्षा पेक्षा जास्त मतं पडली. लोकसभेत आम्ही रामटेक, कोल्हापूर, अमरावती या तीन जिंकलेल्या जागा काँग्रेसला दिल्या. त्यामुळे आम्ही स्ट्राईक रेट मानत नाही. राऊत पुढे म्हणाले, उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हाही काही ठरलं नव्हतं. तेव्हा आघाडीची गरज होती. त्यांनी कोरोना काळात जसं काम केलं त्यामुळे ते लोकप्रिय सीएम ठरले. जनता चेहरा ठरवतील. लोकं ठरवतील चेहरा कोणता. मविआच्या काही तांत्रिक अडचणी असू शकतात. काँग्रेस पक्षाकडे चेहरा असेल तर त्यांनी दाखवावा. त्यांना दिल्लीतून मंजुरी घ्यावी लागतात. आम्ही सांगतो आमचा चेहरा उद्धव ठाकरे आहेत. 

वोट जिहाद म्हणजे काय?
वोट जिहादच्या आरोपावर राऊत म्हणाले, वोट जिहाद काय हे एकदा फडणवीसांनी स्पष्ट करावं. 2014-2019 मध्ये मोदींना मुस्लीम मतं पडली तेव्हा वोट जिहाद नव्हता का? तुम्हाला जेव्हा मतं पडतात तेव्हा वोट जिहाद नसतो का? आमच्यावर वोट जिदाहचा आरोप केला जातो. मुस्लीम हे देशाचे नागरिक आहेत. त्यांनी मतदान कोणाला करावं हा त्यांचा अधिकार आहे. काही दिवसांपूर्वी किरण रिजीजू म्हणाले की, मुस्लीम मतं पडली तर त्यांना मंत्रिपद देऊ. 

मोदींना पॅन इंडियाने स्वीकारलेलं नाही...
इंदिरा गांधींनंतर देशाचं नेतृत्व एकाही व्यक्तीकडे  राहिलेलं नाही. अजूनही देशातील १६ राज्यात मोदी नाही. जम्मू काश्मीरमध्ये राजकारण केलं पण जनतेने त्यांना स्वीकारलं नाही. झारखंड, कर्नाटक, महाराष्ट्र , केरळ येथे मोदींना शिरकाव करता आलेला नाही. ते जगात फिरत असतील. ते जागतिक नेते असतील, मात्र देशाचे नेते आहेत का? विरोधी पक्ष नेते नाही असा प्रकाश आंबेडकरांकडून आरोप केला जात आहे. मात्र राहुल गांधी उत्तम प्रकारे विरोधी पक्ष नेत्याची कामगिरी पार पाडत आहे. आम्ही प्रश्न विचारले म्हणून आम्हाला तुरुंगात टाकले.  प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेमुळे मोदी-शहांना मदत होत असते. काही अप्रत्यक्ष मदत करीत असतात. राज्यात काही लोक असे आहेच जे अप्रत्यक्षपणे मोदी-शहांना मदत करीत असतात. त्यात प्रकाश आंबेडकर आहेत. 

भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चावर राऊत काय म्हणाले? 
तर मी शाहांना भेटणारा शेवटचा माणूस असेल ना? महाराष्टाला ओरबडणाऱ्या व्यक्तीला मी भेटेन असं होऊच शकत नाही. आम्हाला मुखवटे लावून किंवा तोंड लपवून फिरण्याची गरज नाही. दिवसाढवळ्या आम्ही अनेक कामं करू शकतो. आम्ही भाजपसोबत जाणार नाही, शक्यच नाही. आमची मानसिकता नाही. 

आताच्या कोकणाच्या लढती..
लोकसभेला शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कोकणातील जागा जिंकता आल्या नाहीत. याबाबत राऊत म्हणाले, यावर पक्षाकडून विचार करण्याची गरज आहे. मात्र येथे नारायण राणे यांचा फार मोठा विजय झाला नाही. 50 हजारांच्या आत विजय झाला. 43 हजारांच्या फरकाने राणेंचा विजय झाला. कोकणातील घराघरांमध्ये पैशाचं वाटप झालं. 15 हजार एका मतासाठी वाटले. तरीही त्यांना जिंकताना दमछाक झाली. मात्र विधानसभेत चित्र बदललेलं दिसेल. आम्ही का हरलो याचं चिंतन करावं लागेल. मात्र मुंबईबद्दल सांगायचं झालं तर येथे आम्ही 20 जागा जिंकू. मुंबईने नेहमी आम्हाला साथ दिली, ती विधासभेत कायम राहील.