सागर कुलकर्णी
महायुती आणि महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) या दोन्ही आघाड्याचे जागावाटपाचे अद्याप ठरले नाहीये. मात्र यातील बहुतांश पक्षांनी आपापल्या याद्या जाहीर केल्या आहेत. 23 ऑक्टोबर रोजी महाविकास आघाडीने पत्रकार परिषद घेतली (MVA Press Conference) . यामध्ये तीनही पक्षांमध्ये प्रत्येकी 85 जागा लढवण्यासंदर्भात एकमत झालं आहे असे जाहीर करण्यात आले. महाविकास आघाडीतील जागा वाटपाचे नाट्य संपले असे अनेकांना वाटू लागले मात्र मविआतील ड्रामा अजून संपलेला नाहीये.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
या सगळ्या नाट्याला सुरुवात झाली ती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मविआने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करावा या मागणीपासून. उद्धव ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्री व्हायचे आहे हे त्यांची सुप्त इच्छा लपून राहीलेली नाही. उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री व्हावेत, त्यांनीच राज्याची कमान सांभाळावी असे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी जिथे संधी मिळेल तिथे सांगण्यास सुरुवात केली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मात्र उद्धव ठाकरे यांच्या या मागणीला पाठिंबा देण्याच्या मनस्थितीत नाहीयेत. लोकसभा निवडणुकीनंतर तरतरीत झालेल्या काँग्रेसला आपण सर्वाधिक जागा जिंकून आपलाच मुख्यमंत्री बसवावा असे वाटू लागले. महाराष्ट्रातील काँग्रेसचे मातब्बर नेते आपली सत्ता आलीच आहे आणि आपण मुख्यमंत्री बनणारच आहोत या भूमिकेत गेले असल्याचे सांगण्यात येत आहे. या नेत्यांना उद्धव ठाकरेंनी मांडलेली मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करण्याची भूमिका बिलकुल पटली नाही.
नक्की वाचा : विधानसभेला महायुती किती कोटीचा चुराडा करणार? पवारांनी थेट आकडा सांगितला
भूमिकेवरून सुरू झालेला हा वाद जागांपर्यंत पोहोचला. कोणी किती जागा लढवायच्या हे अद्याप निश्चित झालेले नाही. आपापल्या आमदारांना पुन्हा संधी द्यायची हे सगळ्या पक्षांनी ठरवलं आहे. काँग्रेसने सर्वाधिक जागा आपणच लढवायच्या हे निश्चित केलं आहे. मात्र त्यांच्या मार्गात आड आलीय ती शिवसेना. शिवसेना नेत्यांनी लोकसभेप्रमाणेच विधानसभेमध्येही महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांना बाजूला सारत थेट दिल्लीतील नेत्यांशी वाटाघाटी करायला सुरुवात केली. महाराष्ट्रातील काँग्रेस नेतेही लोकसभेत मिळालेल्या धड्यानंतर सावध झाले. त्यांनी दिल्लीतील नेत्यांना हे सातत्याने समजावून सांगितले की लोकसभेसारखी चूक विधानसभा निवडणुकीत करू नका. यामुळे दिल्लीतील काँग्रेस नेत्यांनी महाराष्ट्रातील नेत्यांना कोणत्याही परिस्थितीत झुकू नका, विदर्भातील एकही जागा शिवसेनेला जाऊ देऊ नका असे सांगितले. असं असतानाही जागावाटपाचा तात्पुरता फॉर्म्युला जाहीर केल्यानंतर शिवसेनेने ताबडतोब 65 उमेदवार जाहीर केले. यामघ्ये शिवसेनेने रामटेकमध्येही आपला उमेदवार दिल्याचे स्पष्ट झाले.
नक्की वाचा : ठाकरेंचा नातेवाईक ते भाजपामधून आयात उमेदवार, शिवसेना (उबाठा) पक्षाच्या यादीची 5 वैशिष्ट्य
विदर्भातील या जागांवरून सुरू आहे वाद
- दक्षिण नागपूर- काँग्रेस आणि शिवसेनेत संघर्षयवतमाळ शहर - काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संघर्ष
- अकोला पश्चिम - या मतदारसंघासाठी देखील शिवसेना आग्रही आहे
- कारंजा - इथे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद सुरू आहे
- जळगाव जामोद - या मतदारसंघात काँग्रेस लढत आली आहे मात्र आता ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला हवी आहे.
- दिग्रस - कांग्रेसनेते माणिकराव ठाकरे हे आपल्या मुलासाठी इथे आग्रही होते तर शिवसेनेने पवन जैस्वाल यांच्यासाठी जोर लावलाय.
विदर्भ आणि मुंबईतील जागांवरून घोडे अडले
विदर्भातील वरील जागांव्यतिरिक्त आर्वीवरूनही काँग्रेस आणि शिवसेनेत वाद सुरू आहे. या मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकीटावर लढलेले अमर काळे विजयी झाले होतं. काळे हे नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले. शरद पवारांच्या पक्षातर्फे काळेंनी लोकसभा निवडणूक लढवली आणि ते जिंकले. त्यामुळे या जागेवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोघांनी दावा ठोकलाय. मुंबईतील कुलाबा, भायखळा, वर्सोवा या मतदारसंघांवरून काँग्रेस आणि शिवसेनेत वाद आहेत, जे 23 ऑक्टोबरपर्यंत कायम होते. या जागांव्यतिरिक्त पारनेर, शिर्डी , दर्यापूर या मतदार संघांवरूनही वाद निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे.
नक्की वाचा :महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला, कोणता पक्ष किती जागा लढणार? संजय राऊत यांनी केली घोषणा
कोणत्याही परिस्थितीत 105 जागांपेक्षा कमी जागांवर लढणार नाही अशी काँग्रेसने भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्री पदाकडे डोळे लावून बसलेल्या शिवसेनेला ही गोष्ट परवडणारी नसल्याने त्यांनी काँग्रेसच्या जागा कमी कशा करता येतील याचा प्रयत्न सुरू केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे शांतपणे सगळा खेळ पाहात असून काँग्रेसच्या काही नेत्यांना संशय येतोय की शरद पवारांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना मोहरा करून शांतपणे खेळ्या खेळल्या आहेत.