महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती येत असून महायुतीने विराट विजय संपादन केला आहे. एकीकडे भाजपसह राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार विजयी होत असतानाच माहिममध्ये मनसेला मोठा धक्का बसला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. माहिम मतदारसंघात रंगलेल्या तिरंगी लढतीत शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंत यांचा विजय झाला आहे. राज ठाकरेंसाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.
माहिम विधानसभा मतदार संघामध्ये मनसेकडून अमित ठाकरे, शिवसेना शिंदे गटाचे सदा सरवणकर आणि शिवसेना ठाकरे गटाकडून महेश सावंत यांच्यामध्ये तिरंगी लढत झाली होती. या तिरंगी लढतीत शिवसेना ठाकरे गटाने बाजी मारली असून महेश सावंत यांचा विजय झाला आहे. या निकालाने राज ठाकरेंसह शिवसेना शिंदे गटाचे नेते सदा सरवणकर यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
नक्की वाचा: महायुतीचा विराट विजय! CM एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले..
या निवडणुकीत अमित ठाकरे हे बाजी मारतील अशी शक्यता वर्तवली जात होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्यासाठी जाहीर सभाही घेतल्या होत्या. मात्र तरीही अमित ठाकरे यांना मतदारांनी नाकारल्याचे पाहायला मिळाले. माहिमध्ये ठाकरे गटेच महेश सावंत यांना पहिल्या क्रमांकाची, सदा सरवणकर यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली तर अमित ठाकरे हे तिसऱ्या क्रमांकावर राहिले.
दुसरीकडे वरळी विधानसभा मतदार संघात उद्धव ठाकरेंचे पुत्र आदित्य ठाकरे यांनी विजय मिळवला आहे. आदित्य ठाकरे यांच्यासमोर मनसेकडून संदीप देशपांडे आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार मिलींद देवरा यांचे आव्हान होते. आदित्य ठाकरे यांच्यासमोर मनसेसह एकनाथ शिंदेंनी मोठे आव्हान उभे केल्याने संपूर्ण राज्याचे या लढतीकडे लक्ष लागले होते. या हायहोल्टेज लढतीत आदित्य ठाकरे यांनी विजय मिळवला. या दोन्ही उमेदवारांचे आव्हान मोडीत काढत आदित्य ठाकरे यांनी विजय संपादन केला आहे. सुरुवातीला पिछाडीवर असलेल्या आदित्य ठाकरे यांनी अखेरच्या टप्प्यात मुसंडी मारत दणदणीत विजय मिळवला.
महत्वाची बातमी: दिलीप वळसे पाटील हरलेली बाजी जिंकले, तुतारी - पिपाणीच्या घोळ पथ्थ्यावर