मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने अभूतपूर्व असा विजय संपादन केला आहे. राज्यातील जनतेने भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला भरभरुन मतदान केले असून महायुतीची विराट विजयाकडे वाटचाल सुरु झाली आहे. महायुतीच्या या ऐतिहासिक विजयावर आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली असून महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले आहेत.
काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?
'लँडस्लाईट विक्टोरी अशा प्रकारचा विजय महायुतीला मिळाला आहे. महाराष्ट्रातील तमाम मतदारांचे अभिनंदन. माझ्या लाडक्या बहिणींचे अभिनंदन करतो. लाडक्या बहिणींनी मोठ्या प्रमाणात मतदान केले. लाडक्या भावांनी, लाडक्या शेतकऱ्यांनी मतदान केले. लाडक्या जेष्ठांनी मतदान केले. समाजातील प्रत्येक घटकाने भरभरुन महायुतीला मतदान केले. महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानतो,' अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
नक्की वाचा: घड्याळाचा गजर, तुतारी थंड! शरद पवार विरुद्ध अजित पवार लढाईत कोण जिंकलं?
तसेच' गेल्या अडीच वर्षात महायुतीने काम केले त्या कामाची पोहोचपावती या निवडणुकीत जनतेने दिली. अडीत वर्षात आम्ही जे काम केले, आता पुढच्या काळात आमची जबाबदारी आणखी वाढली आहे. जनतेला त्रिवार वंदन. माझ्या सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांनाही मनापासून वंदन करतो. ते सर्वजण मनापासून काम करत होते. म्हणूनच महायुतीला एवढा मोठा विजय मिळाला. मलाही खूप मोठ्या लिडने विजयी केले, त्याबद्दल त्यांचे आभार..' असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
मुख्यमंत्रीपदाबाबत मोठे विधान...
यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या मुख्यमंत्रीपदाबाबतही महत्वाचे विधान केले. मुख्यमंत्रीपदाबाबतचा निर्णय आम्ही एकत्र मिळून घेऊ. ज्यांचे जास्त आमदार त्यांचा मुख्यमंत्री असं काहीही ठरलेलं नाही. मुख्यमंत्रीपदाबाबत आम्ही एकत्रित निर्णय घेऊ, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world