जाहिरात
This Article is From Jun 14, 2024

महाराष्ट्रातील विदारक चित्र; जिथं पर्यटक घ्यायचे बोटिंगचा आनंद, तिथं भेगाळलेल्या जमिनीवरून माणसांची पायपीट 

याचा परिणाम पर्यटनावरही झाला असून बोटी उघड्यावर पडल्या आहेत.

महाराष्ट्रातील विदारक चित्र; जिथं पर्यटक घ्यायचे बोटिंगचा आनंद, तिथं भेगाळलेल्या जमिनीवरून माणसांची पायपीट 
सातारा:

महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयाच्या पाणीपातळीत आजपर्यंतच्या इतिहासात कमालीची घट झाल्यामुळे पाण्याखाली असणाऱ्या सुमारे 200 वर्षापूर्वीच्या मंदिरांचे तसेच गावठाणाचे अवशेष दिसत असून बोटी उघड्यावर पडल्या आहेत. दरम्यान जिथे बोटी फिरायच्या तिथे माणसांची पायपीट होतानाचे विदारक चित्र भेगाळलेल्या जलाशयाकडे पाहताना दिसून येत आहे. 

परिणामी बोटिंग बंद झाल्यामुळे स्थानिक बोट व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. यावेळी बोट चालकांचा उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, कोयना धरणाच्या निर्मितीपासून शिवसागर जलाशयात कमालीची घट होण्याची सहावी वेळ असून ज्या जलाशयात पर्यटक बोटींगचा आनंद लुटत असतात, त्या ठिकाणच्या बोटी आता भेगाळलेल्या जमिनीवर विसावा घेत आहेत. मात्र बोटिंग व्यवसायावर अवलंबून असलेल्या स्थानिकांची अर्थव्यवस्था यामुळे कोलमडली आहे. 

Latest and Breaking News on NDTV

महाबळेश्वर ते कोयनानगर असा तब्बल 92 किलोमीटर शिवसागर जलाशयाचा फुगवटा पसरला आहे. परिणामी बहुतांश ठिकाणी पाण्याखालील जमीन उघडी पडल्यामुळे मृगजळासारखा भास होत असल्याचे चित्र आहे. या परिसरातील कांदाटी, कोयना, सोळशी खोऱ्यातील 105 गावांचा संपर्क हा जिल्हा परिषदेच्या शासकीय बोटीने तसेच खाजगी बोटींद्वारे होत असतो.

नक्की वाचा - कुठेय समानता? भारतात स्त्री-पुरुषांच्या वेतनात मोठी तफावत, ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्सची धक्कादायक आकडेवारी

मात्र पाणी पातळी खालावल्याने सर्व बोटी बंद असून भेगाळलेल्या पात्रातून दलदलीतून वाट काढत नागरिक दळणवळणाचा प्रश्न सोडवून बाजारपेठ गाठत आहेत. बाजारहाट डोक्यावर घेऊन नागरिकांची कित्येक मैल पायपीट होत आहे.

Latest and Breaking News on NDTV



कोयना धरणाच्या शिवसागर जलाशय पातळीमध्ये जी गावे बुडीत क्षेत्रात गेली व त्यांचे पुनर्वसन झाले त्या बुडीत क्षेत्रातील गावांचे अवशेष यामध्ये मंदिर, घरेही मोठ्या प्रमाणावर दिसायला सुरुवात झाल्याने त्या-त्या गावातील पुनर्वसित झालेले नागरिक मैलोनमैल पायपीट करत त्या अवशेषांपर्यंत पोहोचत आहेत. तेथील मंदिरात देवदर्शन घेऊन जुन्या आठवणींना उजाळा देण्याबरोबरच लुप्त झालेल्या सांस्कृतिक खुणा, परंपरा जपण्याचा प्रयत्न करत आहेत.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: