मनोज जरांगे-लक्ष्मण हाके सोमवारी आमनेसामने येण्याची शक्यता; पोलिसांसह अंतरवालीवासीय टेन्शनमध्ये

मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू असतानाच ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन करणारे लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी ओबीसी आरक्षण बचाव जनआक्रोश यात्रा काढण्याची घोषणा केली आहे. 22 ते 25 जुलै अशी ही यात्रा असून, वेगवेगळ्या जिल्ह्यातून ही यात्रा जाणार आहे.

Advertisement
Read Time: 2 mins

मनोज जरांगे यांनी सगेसोयरे अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करण्याच्या मागणीसाठी पुन्हा एकदा अंतरवाली सराटीत उपोषण सुरू केले आहे. उद्या त्यांच्या उपोषणाचा तिसरी दिवस असणार आहे. अशात लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची ओबीसी आरक्षण बचाव जनआक्रोश यात्रा देखील उद्या (22 जुलै) रोजी अंतरवालीत धडकणार आहे. एकाच दिवशी जरांगे आणि हाके अंतरवालीत असणार असल्याने पोलिसांवरील ताण वाढला आहे. 

सगेसोयरे अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करण्यासाठी मनोज जरांगे यांनी सरकारला 20 जुलैपर्यंत मुदत दिली होती. अन्यथा आपण पुन्हा एकदा उपोषणाला बसणार असल्याचा इशारा दिला होता. मात्र सरकारकडून सगेसोयरे अध्यादेशाबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याने जरांगे यांनी 20 जुलैपासून पुन्हा एकदा अंतरवाली सराटी गावात आपल्या उपोषणाला सुरवात केली आहे. 

मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू असतानाच ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन करणारे लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी ओबीसी आरक्षण बचाव जनआक्रोश यात्रा काढण्याची घोषणा केली आहे. 22 ते 25 जुलै अशी ही यात्रा असून, वेगवेगळ्या जिल्ह्यातून ही यात्रा जाणार आहे. मात्र पहिल्याच दिवशी हाकेंची ओबीसी आरक्षण बचाव जनआक्रोश यात्रा अंतरवालीत धडकणार आहे. उद्या सकाळी 10 वाजता ही यात्रा अंतरवाली गावात पोहचणार आहे. विशेष म्हणजे याच अंतरवाली गावात जरांगे यांचे उपोषण सुरू असून, त्यांच्या उपोषणाचा उद्या तिसरा दिवस आहे.

पोलिसांवरील ताण वाढणार?

29 ऑगस्ट 2023 पासून आतापर्यंत मनोज जरांगे यांचे पाच उपोषण अंतरवाली गावात झाले आहे. पहिल्या उपोषणावेळी झालेल्या पोलीस लाठीमारानंतर अंतरवाली चर्चेत आलं. त्यानंतर नेहमीच जरांगे यांच्या उपोषणास्थळी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. त्यामुळे या गावाच्या परिसरात नेहमी पोलिसांचा मोठा बंदोबस्त असतो.

Advertisement

त्यामुळे गेल्या आठ महिन्यांपासून पोलिसांना अंतरवाली गावात पोलीस बंदोबस्त ठेवावा लागत आहे. अशात आता एकाच दिवशी जरांगे आणि हाकेंसह वाघमारे अंतरवाली गावात येणार असल्याने पोलिसांचा ताण आणखी वाढणार आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षण बचाव जनआक्रोश यात्रेला अंतरवालीत येण्यासाठी पोलिसांकडून परवानगी मिळते का? हे पाहणं महत्वाचे असणार आहे.