Maharashtra Rain: मराठवाड्यात पावसाचा 'हाहाकार', 27 जणांना हेलिकॉप्टरने बाहेर काढले; 'या' जिल्ह्यातील शाळा बंद

Maharashtra Rain Update: मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Maharashtra Rain: मराठवाड्याला पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे.
धाराशिव:

ओंकार कुलकर्णी, प्रतिनिधी

Maharashtra Rain Update: मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अतिवृष्टी आणि पूरजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यातील सर्व शाळांना उद्या, 23 सप्टेंबर रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यात प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांचा समावेश आहे. शिक्षण विभागाने यासंदर्भात पत्रक जारी केले आहे.

चार जणांचा मृत्यू, 72 जनावरे दगावली

गेल्या दोन दिवसांत या अतिवृष्टीमुळे एकूण 4 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. लातूर आणि नांदेड येथे वीज पडून 2 जणांचा, तर लातूर आणि धाराशिव येथे प्रत्येकी 1 व्यक्तीचा पुरात वाहून गेल्याने मृत्यू झाला आहे. याशिवाय, मोठ्या प्रमाणात जनावरांचेही नुकसान झाले आहे. या पावसामुळे एकूण 72 जनावरे दगावली आहेत. सर्वाधिक 21 जनावरे धाराशिव जिल्ह्यात, तर 16 जनावरे बीड जिल्ह्यात दगावली आहेत.

पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान

मराठवाड्यात झालेल्या या विक्रमी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी शेतजमिनी खरडून गेल्या असून, नद्या-ओढ्यांना पूर आला आहे. यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला असून, घरांमध्येही पाणी शिरले आहे. लातूर, बीड, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांना पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे.

( नक्की वाचा : Maharashtra Rain : पुणे, मुंबईकरांनो, सावधान! पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, 'ऑरेंज अलर्ट' जारी )
 

सार्वजनिक मालमत्तेची हानी

या पावसामुळे सार्वजनिक मालमत्तेचेही नुकसान झाले आहे. आतापर्यंत 6 रस्ते आणि 5 पूल वाहून गेले आहेत, तर 4 तलाव फुटले आहेत. तसेच, 76 कच्ची-पक्की घरे कोसळली असून, छत्रपती संभाजीनगरमधील एका शाळेचेही नुकसान झाले आहे. पूर परिस्थितीमुळे छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि धाराशिव जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

Advertisement

27 जणांना हेलिकॉप्टरने बाहेर काढले


पूरग्रस्त भागातून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी मदत आणि बचावकार्य वेगाने सुरू आहे. बीड जिल्ह्यातील 70 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. तसेच, पुराच्या पाण्यात अडकलेल्या 228 नागरिकांना बाहेर काढण्यासाठी बचाव पथके कार्यरत आहेत. धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यात पुरात अडकलेल्या 27 व्यक्तींना भारतीय लष्कराच्या हेलिकॉप्टरच्या मदतीने सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे.

बीडमध्ये एनडीआरएफ (NDRF) पथकाची मागणी करण्यात आली असून, प्रशासनाकडून युद्धपातळीवर मदतकार्य सुरू आहे.
 

Topics mentioned in this article