प्रशांत जव्हेरी, नंदुरबार:
Nandurbar News: नंदुरबारमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शासकीय आश्रम शाळेतील उघड्या सेफ्टी टँकमध्ये पडून विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नवापूर तालुक्यात घडली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली असून मृत मुलाच्या वडिलांनी हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.
सेफ्टी टँकमध्ये पडून विद्यार्थ्याचा मृत्यू
समोर आलेल्या माहितीनुसार, नवापूर तालुक्यातील बंधारे येथील शासकीय माध्यमिक आश्रम शाळेत अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. मुलांच्या वसतीगृहा मागील बाजूस असलेले सेफ्टी टँक उघडी असल्याने त्यात पडून इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या आठ वर्षीय निष्पाप विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. ब्रायन राहुल गावीत (वय 8 वर्ष) असे या मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.
ब्रायन गावीत हा शाळेतून बेपत्ता झाला होता शालेय प्रशासनाने नवापूर पोलीस ठाण्यात तो बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. तेव्हापासून पोलीस, शिक्षक आणि पालक त्याचा शोध घेत होते. मात्र आश्रम शाळेच्या वसतीगृहाच्या इमारतीमागे असलेल्या शौचालयाच्या उघड्या सेफ्टी टँकमध्ये त्याचा मृतदेह आढळून आला.
पालकांचा संताप
यावेळी बालकाचा मृतदेह बाहेर काढून रुग्णवाहिकेतून नवापूर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. यावेळी आई-वडिलांनी व नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केला. पालकांनी देखील शाळा प्रशासनाबद्दल संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. या घटनेमुळे शासकीय आश्रम शाळांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
Pune News : पुण्यातील पावसाचं 'अरबी कनेक्शन'; कशामुळे आभाळ फाटलं आणि शहर बुडालं? वाचा सर्व कारणं
लहान मुले खेळत असलेल्या परिसरात इतका मोठा धोका असताना त्याकडे कोणाचेही लक्ष कसे गेले नाही?विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या अशा निष्काळजीपणाबद्दल आता आदिवासी विकास विभाग काय पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विद्यार्थ्यांचा मृत्यू कसा झाला याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world