
Dharashiv News : निसर्गावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत असताना दिसत आहे. धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्या पाच वर्षात निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसला आहे. कर्ज थकीत असल्यामुळे शेतकऱ्यांची 45 हजार 543 खाती एनपीएममध्ये गेले आहेत.
धाराशिव जिल्ह्यातील 45 हजारांहून अधिक शेतकऱ्यांचे तब्बल 772 कोटी रुपयांचं कर्ज थकलेलं आहे. धक्कादायक म्हणजे ही सर्व खाती आता थेट एनपीएममध्ये गेली आहेत. गेल्या पाच वर्षांत निसर्गाच्या लहरीपणाने शेतकऱ्यांची आयुष्यं उध्वस्त केली. उत्पादन घटलं, नुकसान वाढलं आणि त्यात कर्ज भरणंही अशक्य झालं आहे.
परिणामतः जिल्ह्यातील 45 हजार 543 शेतकऱ्यांची खाती बँकांनी थकीत घोषित केली आहेत आणि आता शेतकऱ्यांना नव्याने कर्ज मिळणंही कठीण झालं आहे. शेतकऱ्यांच्या या परिस्थितीला मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र सरकारच जबाबदार आहे, असा आरोप करीत आमदार कैलास पाटील यांनी थेट सरकारवर हल्ला चढवला आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वतः आश्वासन दिलं होतं की, ‘जर आमचं सरकार आलं तर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा, कोरा, कोरा होईल!' मग ते आश्वासन गेलं कुठं? का शेतकऱ्यांच्या नशिबात अजूनही थकबाकीचं ओझं आहे?
नक्की वाचा - बाकावर बसण्यावरुन वाद; क्लासच्या आवारातच दहावीतील यशराजची निघृण हत्या
इतकंच नाही, आजवर फक्त थकबाकीदार कर्जदारांनाच कर्जमाफी मिळाल्याचा अनुभव आहे. म्हणून अनेक शेतकऱ्यांनी आता तरी माफी मिळेल या आशेने कर्ज थकवलं. पण तेच खाती आता एनपीएममध्ये गेली! त्यामुळे याला तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी दिलेला खोटा शब्द जबाबदार असल्याचं आमदार कैलास पाटील यांनी म्हटले आहे. दरम्यान यावर सरकार काही पाऊले उचलणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world