ऋतिक गणकवार, मुंबई:
Mumbai Crime: चित्रपटसृष्टीत काम करतो असं सांगत महिलांचा विनयभंग करणाऱ्या तरुणाला मुंबईच्या बांगुर नगर पोलिसांनी अटक केली आहे. हा आरोपी मुंबईतील उच्चभ्रू भागांमध्ये महिलांचा विनयभंग करून आपल्या बाईकवरून पळून जायचा. मुख्तार नसीर खान, (वय २३) असं या आरोपीचे नाव असून पोलिसांनी ४८ तासांच्या अथक परिश्रमानंतर आणि २९ सीसीटीव्ही फुटेजच्या तपासणीनंतर आरोपीला अटक केली.
Yavatmal News: जादूटोणा विरोधी कायदा कोमात, भोंदूगिरी जोमात!'या' जिल्ह्यात अनेक गुन्हे पण...
तरुणाचा विकृत छंद..
समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबईतील उच्चभ्रू परिसरांमध्ये महिलांचा पाठलाग करून त्यांचा विनयभंग करणाऱ्या एका २३ वर्षीय तरुणाला बांगूर नगर पोलिसांनी अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, हा आरोपी चित्रपटसृष्टीत कार्यरत असून, स्वतःच्या विकृत छंदासाठी तो दुचाकीवरून येऊन महिलांना लक्ष्य करायचा.
मुख्तार नसीर खान असे या अटकेतील आरोपीचे नाव असून, तो गोरेगाव (पूर्व) येथील आरे कॉलनीत राहतो. गेल्या काही दिवसांपासून हा तरुण मुंबईच्या विविध भागांत महिलांचा विनयभंग करून पसार होत होता. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन बांगूर नगर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. पोलिसांनी तब्बल २९ सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली आणि ४८ तासांच्या अथक परिश्रमानंतर आरोपीपर्यंत पोहोचण्यात यश मिळवले.
छेड काढून पळून जायचा, पोलिसांनी मुसक्या आवळल्या
तपासात आरोपीवर बांगूर नगर पोलीस ठाण्यात दोन आणि समता नगर पोलीस ठाण्यात एक असे एकूण तीन गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांच्या चौकशीत आरोपीने आपल्या विकृत कृत्याची कबुली दिली आहे. "आरोपीला सुंदर महिला आणि मुलींचा विनयभंग करून पळून जाण्याचा एकप्रकारचा छंद जडला होता," असे तपासात समोर आले आहे.
दरम्यान, पोलीस आता याच्या कृत्यांचा अधिक सखोल तपास करत असून, त्याने मुंबईच्या इतर कोणत्या भागात अशा घटना घडवल्या आहेत का, याचा शोध घेत आहेत. या प्रकरणातील निष्पन्न होणाऱ्या नवीन माहितीवरून आणखी गुन्हे दाखल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world