राकेश गुडेकर
मुंबई गोवा महामार्गावर सोमवारी पहाटे मुंबईहुन देवरुख येथे अंत्यसंस्कारासाठी जाणाऱ्या कारचा भीषण अपघात झाला. खेडमधील जगबुडी नदीच्या पुलावरून ही सेव्हन सीटर कार थेट जगबुडी नदीपात्रात कोसळली. या दुर्घटनेत पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे गेल्या काही दिवसांतील जिल्ह्यातील अपघातांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या अपघातासह जिल्ह्यात गेल्या 19 दिवसांत एकूण 23 अपघात झाले. त्यामध्ये एकूण 17 जणांचा मृत्यू झाला तर 33 जण जखमी झाले आहेत. महामार्ग आणि अंतर्गत मार्गावर हे अपघात झाले आहेत. सध्या मुंबई-गोवा महामार्गाचे तसेच रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गाचं काम सुरू आहे. या अपुऱ्या कामामुळे तसेच वेगात वाहने चालवल्यामुळे अपघातांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सध्या उन्हाळी सुटीचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे चाकरमानी तसेच पर्यटक मोठ्या प्रमाणावर कोकणात येत आहेत. मात्र महामार्गावरून येत असताना दोन्ही महामार्गांवर अर्धवट राहिलेल्या कामांमुळे वाहनचालकांना डोकेदुखी होत आहे. या मार्गावरून वाहने नेताना कसरत करावी लागत आहे. काही ठिकाणी झालेलं काम निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे. त्यातच अवघड वळणांवर वाहने कलंडण्याच्या घटना घडत असून, यातून जीवघेणे अपघात गेल्या काही दिवसात झाले आहेत.
वाहनांचा वेगही कारणीभूत
सध्या वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, त्यामुळे रस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढली आहे. त्यातच आता रस्ते मोठे झाले आहेत. त्यामुळे या मार्गावरून भरधाव वेगाने वाहने चालवली जात आहेत. वेगाने जाणाऱ्या वाहनांमुळे अपघातांत अधिकच भर पडत आहे. वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे आणि अति वेगामुळे महामार्गावर तसेच अंतर्गत रस्त्यांवरही अपघात होऊ लागले आहेत.
19 दिवसांत 23 अपघात
1 ते 19 मे या 19 दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यात विविध ठिकाणी 23 अपघात झाले. यात 17 जणांचा मृत्यू झाला. जखमी झालेल्यांची संख्या 33 आहे. तर जानेवारी ते एप्रिलमध्ये एकूण 114 अपघात झाले आहेत. त्यामुळे महामार्गाचं काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं अशी मागणी नागरिक करत आहेत. तसेच वाहनचालकांनी देखील वेगावर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे.