
Mumbai Local Train Effected : मुंबईत पावसाचा कहर वाढत आहे. पुढील 48 तास मुंबईसह उपनगर आणि पश्चिम महाराष्ट्राला धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान मुंबईतील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुंबईतील पावसाचा जोर वाढत आहे. याचा परिणाम मध्य रेल्वेवर होत असल्याचं दिसत आहे.
घाटकोपर आणि कुर्लादरम्यान अप मार्गावर वाहतूक ठप्प असल्याचं समोर आलं आहे. या भागात ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे गेल्या 30 ते 35 मिनिटांपासून गाडी एकाच ठिकाणी उभी आहे. दोन-तीन रेल्वे एका मागोमाग उभ्या आहेत. त्यामुळे प्रवासी लोकलमधून उतरून ट्रॅकवरुन चालताना दिसत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, डाऊन दिशेने गाड्या सुरू आहेत. मात्र पावसाचा जोर असाच राहिला तर लोकल सेवेवर आणखी परिणाम होऊ शकतो.
नक्की वाचा - Mumbai School Holiday : मुंबईतील शाळा-कॉलेजांना सुट्टी जाहीर; कार्यालयांनाही मिळणार का?
सध्या मुंबई, रायगड जिल्ह्याला आणि पुणे घाट, सातारा घाट, रत्नागिरी, कोल्हापूर घाट या भागात रेड अलर्ट तर, पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, अमरावती, चंद्रपूर आणि गडचिरोली या भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
मेट्रो सुरळीत
मुंबईला पावसानं झोडपलं असल्यानं अनेक वाहतुकीची साधनं पावसामुळे खोळंबली आहेत. रस्ते, रेल्वे ट्रॅक पाण्याने भरल्याने बस सेवा तसेच ट्रेन सेवा ही धिम्यागतीने सुरू आहेत. मात्र मुंबई मेट्रोची मार्गिका मेट्रो २ ए आणि ७ या मात्र सुरळीत विना विलंब सुरू आहेत. दोन्ही मार्गिका या उन्नत मार्गावर धावत असल्याने रस्त्यांवर साचलेल्या पाण्याचा किंवा जोरदार पावसामुळे कुठलाही अडथळा येत नसल्याने मेट्रोच्या सेवा सुरळीत आहे. मेट्रो २ ए अंधेरी पश्चिम ते दहिसर पश्चिम तर मेट्रो ७ अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व या दरम्यान धावते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world